Pune – ‘गे’ पार्टनरवर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

एलजीबीटी कायदा मंजूर झाल्यानंतर हा पहिलाच गुन्हा पुण्यात उघडकीस

एमपीसी न्यूज – वारंवार शरीरसुखाची मागणी करणा-या गे पार्टनरवर झोपेतच कोयत्याने  वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी(दि.19) सकाळी सहाच्या दरम्यान शुक्रवार पेठ येथे घडली. एलजीबीटी कायदा मंजूर झाल्यानंतर हा पहिलाच गुन्हा पुण्यात उघडकीस आला आहे.

याप्रकरणी तरुणास पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी शुक्रवार पेठेतील 46 वर्षीय व्यक्तीने खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समलैंगिक संबंधांना मान्यता देणारा कायदा मंजूर झाल्यानंतर हा पहिलाच गुन्हा पुण्यात घडल्याचे समोर आले आहे. यातील जखमी फिर्यादी हे व्यावसायिक आहेत व  त्यांचे समलैंगिक मित्राबरोबर झालेल्या भांडणाच्या कारणावरून मित्रानेच त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

फिर्यादीचे पंचवीस वर्षांपूर्वी लग्न झाले होते. परंतु एका वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर ते एकटेच राहत होते. फिर्यादीची अडीच वर्षापूर्वी पाषाण सूस रस्त्यावर राहणाऱ्या एका तरुणाशी ओळख झाली.
त्यानंतर तरुण व फिर्यादी यांच्यातील नाते घट्ट होऊन ते समलैंगिक मित्र बनले व त्यानंतर ते फिर्यादीच्या शुक्रवार पेठ येथील घरी राहात होते.

फिर्यादीकडून तरुणाकडे सातत्याने शरीरसुखाची मागणी केली जात होती. या प्रकारास तरुण कंटाळला होता. अखेर तरुणाने कोयत्याने फिर्यादी हे झोपेत असतानाच त्यांच्यावर वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पुढील तपास खडक पोलिस करत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.