Vadgaon Maval : प्रचारा दरम्यान दोन गटात हाणामारी; दहा जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – आमच्या भागात प्रचार करण्यासाठी यायचे नाही, असे म्हणत दोन गटात शाब्दिक चकमक उडाली. यातून कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ हाणामारी झाली. हा प्रकार रविवारी (दि. 8) रात्री आठच्या सुमारास वडगाव मावळ येथे घडला. याप्रकरणी 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
उमेश प्रकाश ढोरे, महेश प्रकाश ढोरे, शैलेश प्रकाश ढोरे, प्रकाश ढोरे, गणेश अर्जुन ढोरे, अर्पण ढोरे, आकाश ढोरे, सागर तुमकर, पंढरीनाथ ढोरे (सर्व रा. वडगाव मावळ, ता मावळ) मंगेश हुलावळे (रा. कार्ला, ता. मावळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी यशवंत निवृत्ती शिंदे (वय 36, रा. ढोरे वाडा, वडगाव मावळ ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. 
 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निवृत्ती, माऊली दाभाडे, किरण ढोरे हे तिघेजण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मयूर ढोरे यांच्या प्रचारासाठी केशवनगरमधील पिचड यांच्या घरात चर्चा करीत होते. त्यावेळी वरील आरोपींनी पिचड यांच्या घरात घुसून ‘आमचे एरियात यायचे नाही’ अशी धमकी दिली. निवृत्ती आणि किरण यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. उमेश याने माऊली दाभाडे यांना शिवीगाळ केली. सर्वांनी मिळून कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार मालुसरे तपास करीत आहेत. 
 
याबाबत बोलताना यशवंत शिंदे म्हणाले, कुणीही कुठेही जाऊन प्रचार करू शकतो. मयूर ढोरे यांनी वडगाव मावळ नगरपंचायत परिसरात मागील कित्येक दिवसांपासून स्वतःला सामाजिक कार्यामध्ये वाहून घेतले आहे. याबाबत लोकांच्या काय प्रतिक्रिया येतात, याबाबत आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या घरी चर्चा करीत होतो. त्यावेळी काही लोकांनी येऊन आम्हाला धमकी दिली. आमच्या एरियामध्ये प्रचार करायचा नाही, म्हणत धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिली. ज्येष्ठ कार्यकर्त्यांना मारहाण केली. 
 
पंढरीनाथ ढोरे म्हणाले, ही घटना झाली त्यावेळी मी प्रचारात होतो. घटना झालेल्या भागात नव्हतो. घटना घडल्यानंतर मला फोनवरून घटनेची माहिती मिळाली. तेंव्हा मी तात्काळ घटनास्थळावर पोहोचलो. सर्वांना समजावून सांगितले. तरी देखील आरोपींमध्ये माझे नाव घेण्यात आले आहे. हा माझ्याबद्दल रचलेला राजकीय कुटील डाव आहे. यातून विरोधकांना मतांचे राजकारण करायचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.