Vadgaon Maval : एल अँड टी कंपनीतील कामगारांचा वाद चिघळला; तळेगाव एमआयडीसी बंद करण्याचा आमदार शेळके यांचा इशारा

एमपीसी न्यूज – एल अँड टी कंपनीतील 236 कामगार (Vadgaon Maval) मागील 42 दिवसांपासून कामगार आयुक्त कार्यालय पुणे येथे आंदोलन करीत आहेत. अद्याप त्यांना न्याय मिळालेला नाही. या कामगारांच्या लढ्यात आपण कामगारांसोबत असून कामगारांच्या न्यायासाठी शुक्रवारी (दि.२) तळेगाव एमआयडीसी बंद करण्याचा इशारा आमदार सुनील शेळके यांनी दिला आहे. कंपनी आणि प्रशासनाने कामगारांना न्याय देण्याची मागणी आमदार शेळके यांनी केली आहे.

एल अँड टी कंपनीतील कामगारांच्या हक्कासाठी त्यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहण्याची गरज आहे. त्यासाठी आता लढा उभा करण्याची वेळ आली आहे. म्हणून शुक्रवार दि.2 डिसेंबर रोजी तळेगाव एमआयडीसी बंद करण्याचा इशारा आमदार सुनिल शेळके यांनी दिला आहे. एल अँड टी कंपनीमध्ये काम करणारे स्थानिक भूमिपुत्र आपल्या हक्कासाठी पुणे कामगार आयुक्तालय येथे आंदोलन करीत आहेत. त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही. कामगार आयुक्तालय आणि एल अँड टी कंपनी व्यवस्थापन यांच्या बैठकीतून मार्ग निघेल अशी अपेक्षा सर्वांना होती. परंतु, स्थानिक भूमिपुत्रांना वार्‍यावर सोडून कंपनी चालवून दाखवू अशी आडमुठेपणाची भूमिका कंपनी व्यवस्थापन घेत आहे. याला विरोध करण्यासाठी आमदार शेळके यांनी एमआयडीसी बंद करण्याचा पवित्रा घेतला आहे. स्थानिकांच्या हक्कांसाठी या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

भूमिपुत्रांना हक्क मिळवून देऊ : Vadgaon Maval

कंपन्या स्वतःच्या हितासाठी, नफेखोरीसाठी जर अशा पद्धतीने काम करणार असतील, तर अशा कंपन्यांच्या विरोधात लढा उभा करण्याची वेळ आता आली असल्याचे आमदार शेळके यांनी म्हटले आहे. भविष्यात कुठल्याही कंपनीने स्थानिक भूमिपुत्रांना वेठीस धरून मुजोरपणा करण्याची हिंमत दाखवू नये.

1 डिसेंबरपर्यंत एल अँड टी कंपनीच्या व्यवस्थापकांनी कामगार बांधवांना योग्य न्याय दिला नाही. तर दोन डिसेंबर रोजी सर्व पक्ष, संघटना व स्थानिक भूमिपुत्रांच्या उपस्थितीत तळेगाव एमआयडीसी बंद करण्यात येईल, असा इशारा आमदार शेळके यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.