Pune : मुळा-मुठा नदीपात्रात भराव टाकून अतिक्रमण – वंदना चव्हाण

एमपीसी न्यूज – नायडू हॉस्पिटलच्या बाजूने आणि संगमवाडी येथे मुळा – मुठा नदीपात्रात भराव टाकून अतिक्रमण करण्यात येत असल्याचे राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांनी सांगितले.

संगमवाडीच्या बाजूला मुळा – मुठा नदीपात्रात खूप भर टाकण्यात आलेली आहे. तेथे खाजगी बसेससाठीचे स्थानके करण्यात आलेली आहेत. हे रोज राजरोसपणे सुरू आहे. याबाबत अनेकदा महापालिकेला अतिक्रमण असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. नायडू हॉस्पिटलच्या बाजूनेसुद्धा नव्याने भराव टाकण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे नदीपात्राची वहन क्षमता कमी होऊन फुगवटा तयार होऊ शकतो.

लोकांना गंभीर पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागेल. या भरावामुळे नदीपात्रातील जैवविविधतेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याकडे ताबडतोब लक्ष द्यावे. तसेच, शहरातील बांधकामांचा राडारोडा व उत्खननाचा राडारोडा कुठे टाकायचा याबाबत महापालिकेकडून लोकांना सांगण्यात येत नाही. त्यामुळे हा राडारोडा नदीपात्र अथवा डोंगराळ भाग या ठिकाणी टाकला जातो. यावरही उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे वंदना चव्हाण यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.