Pune : नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी झाडे कापण्याचा काँग्रेस – राष्ट्रवादीतर्फे निषेध

आंदोलन करण्याचा खासदार ऍड. वंदना चव्हाण यांचा इशारा

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी स. प. महाविद्यालयाच्या मैदानावरील झाडे तोडण्याचा काँग्रेस – राष्ट्रवादीतर्फे आज निषेध करण्यात आला. प्रसंगी आंदोलनही करण्याचा इशारा खासदार ऍड. वंदना चव्हाण यांनी दिला. काँगेसच भवन येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. माजी आमदार मोहन जोशी यावेळी उपस्थित होते.

वंदना चव्हाण म्हणाल्या, “पंतप्रधान मोदी यांच्या सभेसाठी भयानक पद्धतीने ही झाडे तोडली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या मार्गामध्येही झाडे येत नव्हती. तरीही झाडे कापण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. पण, काहीही कारवाई झाली नाही. मुख्यमंत्री, महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्र दिले. अतिरिक्त आयुक्तांनी या संबंधीचा अहवाल दिला आहे. स. प. महाविद्यालयाच्या मैदानावरील झाडे तोडणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणीही चव्हाण यांनी केली.

मोहन जोशी म्हणाले, “अशा पद्धतीने झाडे तोडता येत नाहीत. मुंबईतील आरे मधीलही हजारो झाडे अशाच पद्धतीने तोडण्यात आली होती. पुणेकर पर्यावरणप्रेमी आहेत. येत्या 21 ऑक्टोबरला मतदान पेटीतून उत्तर देतील”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.