Pimpri : शहरातील पादचारी मार्ग अतिक्रमणांच्या विळख्यातून मुक्त करा

विविध सामाजिक संघटनांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात मोठमोठे रस्ते झाले. त्याच्या बाजूने पादचारी मार्ग देखील तयार करण्यात आले. मात्र हे पादचारी मार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात अडकून पडले आहेत. त्यामुळे पादचा-यांना आणि प्रसंगी सर्वांनाच वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे शहरातील पादचारी मार्ग अतिक्रमणाच्या विळख्यातून सोडविण्याची शहरातील विविध १३ सामाजिक संघटनांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांकडे मागणी केली.

सावरकर मंडळ, सिनिअर सिटीझन फोरम, ग्राहक मंच, स्वामी समर्थ मंडळ, अगरवाल समाज, लायन्स क्लब, निगडी प्राधिकरण रेसिडेंट फोरम, पिंपरी चिंचवड सिटीझन फोरम, डॉ. आंबेडकर रोड रेसिडेंट्स फोरम, मित्र परिवार सोशल फाउंडेशन, पेडिस्ट्रियन फर्स्ट, इंडो सायकलिस्ट क्लब आदी संस्थांनी आयुक्तांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, शहरात सर्व रस्त्यांच्या बाजूने पादचारी मार्ग बनविण्यात आले आहेत. त्या पादचारी मार्गांवर मोठ्या प्रमाणात फेरीवाले, टप-या यांचे जाळे वाढले आहे. हे जाळे दिवसेंदिवस विस्तारत आहे. पादचारी मार्गावर एक दुकान असेल तर त्याशेजारी एखादे वाहन थांबलेले असते. तसेच काही लोक उभे असतात. यामुळे विनाकारण रस्त्यावर गर्दी तयार होते. याचा येणा-या जाणा-या सामान्य नागरिकांना नाहक त्रास होतो. प्रसंगी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक मोकळी ठेवण्यासाठी फेरीवाल्यांवर योग्य ती कारवाई करून पादचारी मार्ग मोकळे करावेत.”

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, “शहरात हॉकर पॉलिसी बनविण्यात येत आहे. ती तयार झाल्यास फेरीवाल्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. यातून नागरिकांना न्याय मिळेल. पॉलिसी तयार होईपर्यंत मुख्य चौक आणि मुख्य मार्गांवर योग्य तोडगा काढण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.