Seema Deo : ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन

एमपीसी न्यूज : मराठी आणि हिंदी चित्रपटांतील (Seema Deo) प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांचे आज निधन झाले आहे. त्या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. अल्झायमर या आजाराने त्यांना ग्रासले होते. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतली सोज्ज्वळ अभिनेत्री अशी सीमा देव यांची ओळख होती. त्यांचे पती दिवंगत अभिनेते रमेश देव यांचे मागील वर्षी निधन झाले. सीमा देव यांचे मूळ नाव नलिनी सराफ असे होते. त्यांचा जन्म मुंबई मधील गिरगाव येथे झाला. अभिनेते रमेश देव यांच्याशी सन 1963 मध्ये त्यांचा विवाह झाला. अभिनेते अजिंक्य देव आणि दिग्दर्शक अभिनय देव ही त्यांची दोन मुळे आहेत. सीमा देव आणि रमेश देव यांनी सन 2013 मध्ये त्यांच्या लग्नाची पन्नाशी साजरी केली.

त्यांनी सन 1957 साली सिनेसृष्टीत पदार्पण केले. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यांनी 80 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले. अपराध, वरदक्षिणा, जुने ते सोने, जगाच्या पाठीवर, बदला, जवानी की कहानी, नसीब अपना अपना, सर्जा, मोलकरीण, दादा, आनंद, भाभी कि चुडिया, संसार, बेनाम बादशाह, ओवाळीते भाऊराया, यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या, सुवासिनी, हा माझा मार्ग एकला अशा अनेक चित्रपटांमधील भूमिका गाजल्या.

सन 2017 मध्ये पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.