Wakad Crime News : रस्त्यावर थांबून ओला कॅब बुक करणं पडलं महागात; चोरट्यांनी हातातील दोन्ही मोबाईल पळवले

एमपीसी न्यूज – रस्त्यावर थांबून मोबाईलमधून ओला कॅब बुक करणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलंय. कॅब बुक करत असताना दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी त्या व्यक्तीच्या हातातील दोन्ही मोबाईल फोन जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 15) रात्री भुजबळ चौक, वाकड येथे घडली.

प्रमोद गुलाब बोदक (वय 44, रा. दापोडी) यांनी याबाबत बुधवारी (दि. 17) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दुचाकीवरील तीन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सोमवारी रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास वाकड मधील भुजबळ चौकात ओला कॅब बुक करत होते. मोबाईलद्वारे कॅब बुक करत असताना एका दुचाकीवरून तीन चोरटे आले. त्यांनी फिर्यादी यांच्या हातातील 11 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेले.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.