Pune Crime News : उसने दिलेले पैसे परत मागितल्यामुळे केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – उसने दिलेले वीस हजार रुपये परत मागितल्याच्या कारणावरुन तीन जणांच्या टोळक्याने एका 36 वर्षीय व्यक्तीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.

लोहगाव विमानतळ शेजारी असणाऱ्या विमाननगर आणि बोपखेल येथील गणेश नगर भागात 23 फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी तिघांविरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर विमानतळ पोलिस ठाण्यात हा गुन्हा वर्ग करण्यात आला.

फईम इक्रमउद्दीन अन्सारी (वय 36) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी आसिफ (वय 25) नाझीम (वय 23) आणि बुऱ्हाण (वय 25) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी सलीम इक्रमउद्दीन अन्सारी (वय 37) यांनी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मयत फईम इक्रमउद्दीन अन्सारी याने आरोपी नाझीम याला वीस हजार रुपये उसने दिले होते. हे वीस हजार रुपये त्याने नाझीम याचा भाऊ आसिफ याच्याकडे परत मागितले होते. याचा राग मनात ठेवून येथील आरोपी अशी याने इतर दोघांना बोलावून घेत फईम याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी हा वाद मिटवण्यासाठी फईम याला बोपखेल येथील गणेशनगर मध्ये बोलावून घेत पुन्हा मारहाण केली. यातील आरोपी नाजिम याने फईम त्याच्या नाकावर  मारल्यामुळे फईम याचा मृत्यू झालाय.

सुरुवातीला पोलिसांनी दिघी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला होता. परंतु सुरुवातीला मारहाणीचा प्रकार विमान नगर मध्ये घडल्यामुळे हा पुन्हा विमानतळ पोलिसांकडे वर्ग केला आहे. अधिक तपास सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.