Wakad : ‘डिलिव्हरी बॉय’ला अडवून एक लाखांच्या सिगारेट चोरल्या; पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – ‘डिलिव्हरी बॉय’ला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अडवून त्याच्याकडून सुमारे 1 लाख 15 हजार 844 रुपयांच्या सिगारेट जबरदस्तीने चोरून नेल्या. याप्रकरणी पाच जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

अतुल चंद्रकांत निसर्गंध (वय 20), ओंकार ऊर्फ बाबू नंदकुमार वैराट (वय 19), अँथोनी डॅनियल अरकस्वामी (वय 20), राहुल प्रदीप शिंदे (वय 24, सर्व रा. घरकुल, चिखली), विकास पोपट वायकर (वय 21, रा. च-होली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी रोशन रमेश वाधवानी (वय 39, रा. पिंपरी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाधवानी हे व्यापारी आहेत. त्यांचे शगुन चौकात बॉम्बे स्टोअर्स नावाचे दुकान आहे. आशिष हरले त्यांच्याकडे सेल्समन म्हणून काम करतो. आशिष 27 डिसेंबर रोजी सकाळी दुचाकीवरून सिगारेटची डिलिव्हरी देण्यासाठी मारुंजी येथे जात होता. आरोपींनी त्याला थेरगाव येथे पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवले.

आशिषला मारहाण करून त्याच्याकडील एक लाख 15 हजार 844 रुपये किमतीची सिगारेटची बॅग हिसकावून घेतली आणि पोबारा केला. फिर्यादी वाधवानी कामानिमित्त मुंबई येथे गेले होते. मुंबईहून आल्यानंतर त्यांनी शनिवारी (दि. 4) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.