Wakad: भक्ती आणि सत्कर्म ही उन्नत जीवनाची आधारशिला – योगीराज महाराज पैठणकर

एमपीसी न्यूज – भक्ती आणि सत्कर्म ही उन्नत जीवनाची आधारशीला आहे. अल्प आयुष्यामध्ये असं काही कराव की, स्वकल्याणासहित समाजाचे भले होईल. ईश्‍वरभक्ती तथा नामस्मरण हे स्वकल्याणाचे साधन असून सार्वभौम विचाराने समाजाचे कल्याण होणार आहे. माणूस किती जगला यापेक्षा तो कसा जगला याला महत्व आहे. कै. पांडुरंग भाऊंचे जीवन हे परोपकार, त्याग व सत्कर्मावर आधारीत होते. त्यांचा आदर्श समोर ठेवून संपूर्ण कलाटे परिवार समाजसेवा, उद्योग यामध्ये अग्रेसर आहे. भाऊंसारखे आदर्श जीवन जगले. त्यांचा वसा पुढच्या पिढ्यांनी चालू ठेवावा, अशी अपेक्षा योगीराज महाराज पैठणकर यांनी व्यक्त केली.

वाकड येथील माजी नगरसेवक कै.पै.पांडुरंग धोंडीबा कलाटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पैठणकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी महाराजांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार नाना नवले, गजानन बाबर, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, भाऊसाहेब भोईर, सर्वपक्षीय आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, वारकरी सांप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार मंडळी व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन ह.भ.प.वसंत कलाटे, बाळासाहेब जाधव, शिरीष कलाटे व सहकार्‍यांनी केले होते. पाहुण्यांचे स्वागत उद्योजक मोहन कलाटे, नगरसेवक मयूर कलाटे, नगरसेवक राहुल कलाटे यांनी केले.

संत एकनाथ महाराजांच्या हरीपाठातील परिमल गेली या ओस फुल देठी, आयुष्याच्या शेवटी देह तसा या अभंगावर संत एकनाथ महाराजांचे 14 वे वंशज ह.भ.प. योगीराज महाराज पैठणकर यांचे कीर्तन झाले. संचित, प्रारब्ध आणि क्रीयमाण या कर्मसिद्धांताचे विविध दृष्टांत देऊन विस्तृत वर्णन केले. पैठणकर महाराज पुढे म्हणाले की, तो काळ आपल्या सर्वांचा घास घेण्यासाठी तयारच आहे. तत्पुर्वी आपण सत्कृत्य करून आपले कल्याण करून घेणे हिताचे आहे. त्यासाठी आपण आपल्या मनाला प्रेरणा देणे गरजेचे आहे. ती देता येत नसेल तर सद्गुरूंना शरण जाऊन आपले हित साधणे शक्य होईल.

हरिच्या प्राप्तीसाठी नामरूपी साधना महत्वाची आहे. हे नाम आपल्या मुखात अखंड असणे आवश्यक आहे. पांडुरंगभाऊ कलाटे यांचे जीवन हे परोपकार, त्याग आणि लोकसेवेत व्यतीत झाले होते. तोच आदर्श समोर ठेवून कलाटे परिवार समाजसेवेत कार्यरत आहे. वारकरी संप्रदायाची सेवा वेगवेगळ्या माध्यमातून घडत आहे. भाऊ आदर्श जीवन जगले तोच कित्ता त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी गिरविला पाहिजे, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.