Wakad : पैशांच्या व्यवहारातून मित्राचा खून करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणा-या दोघांना वाकड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज – मैत्रिणीच्या नावावर असलेल्या फ्लॅटवर कर्ज करून ती रक्कम मित्राला वापरण्यास दिली. मित्राने ती रक्कम वेळेवर परत न केल्याने बँकेने तगादा लावला. यातूनच कर्जदार मित्राने हात उसने पैसे दिलेल्या मित्राचा रुमालाने गळा आवळून खून केला. तसेच मृतदेह घाटात टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. वाकड पोलिसांनी कसून तपास करत दोघांना अटक केली आहे.

याप्रकरणी वाकड पोलिसांनी दत्ता नवनाथ बिरंगळ (वय 30, रा. नेवाळेवस्ती चिखली, मूळ रा. सोनेगाव, ता. जामखेड, जि. अहमदनगर) आणि समाधान बिभीषण भोगल (वय 24, रा. जाधववाडी, चिखली. मूळ रा. बोरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) या दोघांना अटक केली आहे. तेजस सुनील भिसे (वय 28, रा. रहाटणी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तेजस हा जुन्या वाहनांची खरेदी-विक्रीचे काम करीत होता. त्याने त्याच्या मैत्रिणीच्या नावावर चिखली येथे असलेल्या फ्लॅटवर बँकेतून कर्ज घेतले. ती रक्कम त्याने दत्ता याला हातऊसनी वापरण्यासाठी दिली. परंतु ती रक्कम दत्ता याने वेळेत परत न केल्याने बँकेचे हप्ते भरणे बंद झाले. कर्जफेडीसाठी बँकेने तेजस आणि त्याच्या मैत्रिणीकडे तगादा लावला. यामुळे तेजस दत्ताकडे वारंवार पैशाची मागणी करत होता. त्यावरून त्यांच्यात वाद होत होते.

20 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता तेजस धुळे, अमरावती येथे जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला. नंतर त्याने त्याचा मावसभाऊ नितेश अंबादास भोरे याला फोन करून सांगितले की, ‘तो दत्ता बिरंगळ याच्यासोबत आहे.’ 21 एप्रिल रोजी ‘तेजस जी कार घेऊन गेला आहे, ती कार काळेवाडी येथील भोईर लॉन्स जवळ चावीसह सोडली’ असल्याचा मेसेज नितेश याच्या मोबाईलवर आला. कार मिळाली. परंतु तेजस घरी न आल्याने तसेच त्याच्याशी कोणताही संपर्क होत नसल्याने त्याचा भाऊ प्रवीण सुनील भिसे (वय 29) यांनी याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात तेजस हरविल्याची तक्रार नोंदविली.

  • दत्ता बिरंगळ याने 22 एप्रिल रोजी दुपारी फोन बंद केला. त्याच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. यामुळे त्याच्यावर संशय बळावला. त्यावरून दत्ता बिरंगळ याच्या विरोधात तेजसच्या अपहरणाचा गुन्हा नोंदवला. वाकड पोलिसांनी प्रकरणाची कसून चौकशी करत दत्ता आणि समाधान या दोघांना अटक केली.

आरोपी दत्ता आणि समाधान या दोघांनी तेजसचा कारमधून जात असताना जामखेड येथे रुमालाने गळा आवळून तेजसचा खून केला. तेजसचा मृतदेह अहमदनगरजवळील सौताडा घाटामध्ये 60 फूट खोल दरीत फेकून दिला. त्यानंतर दत्ता आणि समाधान यांनी तेजसचे कपडे, बेल्ट, बूट व इतर साहित्य अहमदनगर जिल्ह्यातील राजुरी येथे जाळले असल्याची कबुली दिली. यावरून आरोपींविरोधात खुनाच्या गुन्ह्याची कलम वाढ करण्यात आली आहे.

  • ही कारवाई पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) ज्ञानेश्‍वर साबळे, पोलीस उपनिरीक्षक हरीश माने, सिद्धनाथ बाबर, पोलीस कर्मचारी बिभीषण कन्हेरकर, बापूसाहेब धुमाळ,नितीन ढोरजे, दीपक भोसले, रमेश गायकवाड, जावेद पठाण, विजय गंभीरे, प्रमोद कदम, विक्रम कुदळ, नितीन गेंगजे, शाम बाबा, सुरेश भोसले, भैरोबा यादव, मयूर जाधव, सुरज सुतार यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.