Hinjawadi : किरकोळ कारणावरुन एकावर तलवारीने वार

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून चार जणांनी मिळून एकावर तलवारीने वार केले. तसेच जखमीच्या पेइंगगेस्टला देखील मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 26) रात्री पावणेबाराच्या सुमारास तन्मय गेस्ट हाऊस, वाकड येथे घडली.

निखिल पांडुरंग चव्हाण (वय 33, रा. थेरगाव) असे जखमी घर मालकाचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सुमित सुनील सावंत (वय 18), सुमित गंगाधर बलखांडे (दोघे रा. भुमकर वस्ती), दत्त माणिक शिंदे, करण अंकुश आडागळे (दोघे रा. थेरगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल चव्हाण यांचे भूमकर चौकातील भगवान नगर येथे तन्मय गेस्ट हाऊस आहे. त्यामध्ये प्रतीक दयाराम मालवीय (वय 29) हा पेईंग गेस्ट म्हणून राहतो. तो बुधवारी रात्री सिगारेट ओढण्यासाठी जवळच्या पानटपरीवर गेला. तिथे एक मुलगा सिगारेट पीत होता. मुलाच्या सिगारेटची राख प्रतीकच्या हातावर पडली. प्रतीकने याबाबत काहीही विचारले नाही. तरीदेखील समोरच्या मुलाने प्रतिकला शिवीगाळ करून मारहाण केली.

त्यानंतर सर्व आरोपी प्रतीक राहत असलेल्या पेइंग गेस्ट रूममध्ये आले. आरोपींनी खोलीतील सर्व साहित्याची तोडफोड करण्यास सुरुवात केली. यामुळे निखिल चव्हाण आरोपींना अडवण्यासाठी गेले असता आरोपींनी निखिल यांच्यावर तलवारीने वार केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.