Pimpri: आरोग्य कर्मचा-यांवार प्रशासन अधिका-यांचा राहणार ‘वॉच’!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांवर आता क्षेत्रीय कार्यालयातील प्रशासन अधिका-यांचा ‘वॉच’ राहणार आहे. प्रशासन अधिकारी अचानक कामाच्या ठिकाणी जाऊन कर्मचारी जागेवर आहेत की नाही याची पाहणी करणार आहेत. हजेरीपुस्तकाची तपासणी केली जाणार आहे. यामुळे कामचुकार कर्मचा-यांना लगाम बसणार आहे. याबाबतचा आदेश प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे यांनी पारित केला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात आठ क्षेत्रीय कार्यालये आहेत. शहाराच्या दैनंदिन स्वच्छता विषयक कामाजाकरिता क्षेत्रीय कार्यालमध्ये आरोग्य विभाग कार्यरत आहे. महापालिका कार्यक्षेत्राचा वाढलेला क्षेत्रविस्तार, प्रशासकीय आव्हाने, स्वच्छ भारत अभियान, स्मार्ट सिटी प्रकल्प इत्यादी योजना विचारात घेऊन उपलब्ध मनुष्यबळाचा वापर केला जातो. सार्वजनिक आरोग्याशी संबंधित दैनंदिन कामकाजासाठी कर्मचा-यांच्या नेमणूका केल्या जातात. क्षेत्रीय कार्यालयाकडील आरोग्य विषयक कामकाजाचे नियोजन, समन्वय व नियंत्रणास सहाय्यक आरोग्यधिकारी करतात. अधिकारी, कर्मचा-यांना बायोमेट्रीक हजेरी बंधनकारक आहे. तथापि, अनेक कर्मचारी हजेरी लावून वैयक्तीक कामे करतात. कामचुकारपणा करतात. त्यांचे कामावर लक्ष नाही, अशा तक्रारी वारंवार केल्या जातात.

त्यामुळे आता आरोग्य विभागातील कर्मचा-यांवार ‘वॉच’ ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातील प्रशासन अधिका-याने वेळोवेळी कामाच्या जागेवर अचानक जावून कर्मचारी जागेवर आहेत की नाही याची तपासणी करावी. हजेरीपुस्तकाची तपासणी करावी. आरोग्य विभागाच्या हजेरीच्या ठिकाणी हजेरीच्यावेळी प्रत्यक्ष उपस्थित रहावे. नियमानुसार हजेरीचे कामकाज करुन घ्यावे. उपलब्ध कर्मचा-यांचे नियोजन करुन कामकाजाचे वाटप करावे.

प्रशासन अधिकारी व सहाय्यक आरोग्य अधिका-याने 15 दिवसातून एकदा असे महिन्यातून दोन वेळेस अचानकपणे कामाच्या ठिकाणी जाऊन चतृर्थश्रेणीच्या कर्मचा-यांची हजेरी, कामकाजाची तपासणी करावी. त्याचा अहवाल निमितपणे प्रशासन विभागाकडे सादर करावा. क्षेत्रीय अधिका-याने हे कामकाज कार्यक्षमतापूर्वक होत आहे की नाही, याची खात्री करुन  घ्यावी. कार्यालयीन शिस्तीचे पालन न करणा-या कर्मचा-यांवर विभागप्रमुखांना प्रदान केलेल्या अधिकारात नियमाधीन कारवाई करावी, असे याबाबतच्या परिपत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.