Water supply: येत्या 4 दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा अधिकाऱ्यांना काळे फासू  – सचिन साठे

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड शहरात आणि पिंपळेनिलख, विशाल नगर परिसरात मागील तीन वर्षांपासून दिवसाआड अनियमित पाणीपुरवठा (Water supply) करण्यात येत आहे. पिंपळेनिलख  गावठाण परिसर, गणेश नगर, रक्षक सोसायटी, पंचशील नगर, विशाल नगर, आदर्श नगर, जगताप डेअरी या भागातील सोसायटीतील नागरिकांनी आतापर्यंत लाखो रुपये पाण्याच्या टँकरसाठी दिले आहेत. या करदात्या नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करणे प्रशासनाचे कर्तव्य आहे. गेल्या काही दिवसांपासून अतिशय कमी पाणी येत आहे. येत्या 4 दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा अधिकाऱ्यांना काळे फासू,  असा इशारा काँग्रेसचे प्रदेश सचिव सचिन साठे यांनी दिला.

 

साठे म्हणाले, 1 जुलैपर्यंत पिंपळे निलख, विशाल नगर येथील नागरिकांना स्वच्छ आणि पूर्ण दाबाने, नियमितपणे पाणी पुरवठा झाला नाही. तर, शुक्रवारी 1 जुलै रोजी दुपारी तीन वाजता आपल्या कार्यालयात येथील नागरिक त्याच गढूळ पाण्याने संबंधित अधिकारी यांना आंघोळ  (Water supply) घालून त्यांच्या तोंडाला काळे फासतील. “ड” प्रभाग कार्यालयात झालेल्या जनसंवाद सभेत साठे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना गढूळ पाण्याच्या बाटल्या दाखवून इशारा पत्र दिले. यावेळी अमित कांबळे, विजय जगताप, सचिन जाधव, केवल साठे, निखिल दळवी, सुमीत कर्नावट, नंदाताई गोसावी, जयश्री भिलारे, सीमा टकले, सुनंदा सलगर, राधाताई गोसावी आदी नागरिक उपस्थित होते. यावेळी साठे यांनी अधिकार्‍यांना चांगलेच फैलावर घेतले. यानंतर संबंधित अधिकाऱ्यांशी बोलताना देखील त्यांनी नागरिकांचा याबाबतीत रोष अधिकाऱ्यांच्या नजरेस आणून दिला.

 

ED Summons Sanjay Raut : शिवसेनेची अडचण वाढली! खासदार संजय राऊत यांना ईडीची नोटीस

 

आयुक्त यांच्या नावे दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मे महिन्यात दहा हजार नागरिकांच्या सह्यांचे दिले. या विषयावर वेळोवेळी झलेल्या बैठकीत संबंधित अधिकारी यांनी तात्पुरत्या स्वरूपात “बूस्टर” यंत्रणा उभारू असे आश्वासन दिले होते. मागील दोन महिन्यांपासून यात काही प्रगती झालेली नाही. उलट आता दिवसाआड पाणीपुरवठा (Water supply)  होत होता तो आता दोन, तीन दिवसांनी आणि गढूळ पाणी पुरवठा होता आहे. आता जर शुक्रवार 1 जुलैपर्यंत पिंपळे नीलख, विशाल नगर येथील नागरिकांना स्वच्छ आणि पूर्ण दाबाने, नियमितपणे पाणी पुरवठा झाला नाही. तर, शुक्रवारी 1 जुलै रोजी दुपारी तीन वाजता आपल्या कार्यालयात येथील नागरिक त्याच गढूळ पाण्याने संबंधित अधिकारी यांना आंघोळ घालून त्यांच्या तोंडाला काळे फासतील. या नंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीस तुमचे प्रशासन जबाबदार असेल.

 

 

या विषयावर या पूर्वी अनेक जनसंवाद सभेत देखील आवाज उठविण्यात आला होता. तरी देखील निव्वळ वेळ काढूपणाची भूमिका अधिकारी घेत आहेत. आता नागरिकांची सहनशीलता संपली आहे. त्यांच्या सहनशीलतेचा उद्रेक होऊ शकतो. या पत्राद्वारे आपणास विनंती करतो की, “बूस्टर” यंत्रणा आणि आणखी एक पाण्याची उंच टाकी येथे उभारण्याबाबत युद्ध पातळीवर कारवाई करावी, अन्यथा येथील नागरिक पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत असाही इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव साठे यांनी या पत्रात दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.