Pune : मुले व केअरगिव्‍हर्सकरिता अनुकूल बनवण्‍यासाठी अर्बन ९५ सारख्‍या उपक्रमांचे स्‍वागत – रुबल अग्रवाल

एमपीसी न्यूज – पुणे स्‍मार्ट सिटीज मिशनसह अनेक गोष्‍टींमध्‍ये अग्रस्‍थानी असणारे शहर आहे. आम्‍ही शहरी क्षेत्रांमध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणण्‍यासाठी आणि या क्षेत्रांना मुले व केअरगिव्‍हर्सकरिता अनुकूल बनवण्‍यासाठी अर्बन ९५ सारख्‍या उपक्रमांचे स्‍वागत करतो, असे पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले.

आम्‍हाला बर्नार्ड व्‍हॅन लीअर फाउंडेशन आणि आयटीडीपीच्‍या सहयोगाने पुण्‍यामध्‍ये ‘ट्रान्सफॉर्मिंग अर्बन मोबिलिटी टू नर्चर अर्ली चाइल्डहूड डेव्हलपमेंट इन इंडिया’ प्रकल्‍प सादर करण्‍याचा अभिमान वाटत आहे. आम्‍ही शहरामध्‍ये मोबिलिटीच्‍या माध्‍यमातून मुलांच्‍या सुरूवातीच्‍या काळातील विकासाला चालना देण्‍यामध्‍ये आणि बालपणीच्‍या सुरूवातीच्‍या काळामध्‍ये उत्तम सुविधा उपलब्‍ध करून देण्‍यामध्‍ये सहभाग घेण्‍यासाठी उत्‍सूक असल्याचेही त्या म्हणाल्या.

बीव्हीएलएफच्या भारत प्रतिनिधी रुशदा मजीद म्हणाल्या, “बालके व लहान मुले त्यांची काळजी घेणाऱ्यांवर अवलंबून असतात. त्यांची काळजी आई, वडील, मोठी भावंडे किंवा आजी-आजोबा घेतात. चालण्यासाठी भोवताल किंवा सार्वजनिक वाहतुकीची साधने अयोग्य दर्जाची असतील तर ही मुले त्यांच्या आई-वडिलांसोबत, आजी-आजोबांसोबत फारशी बाहेर जाऊ शकत नाहीत. बाहेर गेली तरी त्यांचा प्रवास अवघडलेला, वेळखाऊ होतो. त्यांचा असुरक्षित परिस्थितीशी संपर्क येतो. त्यांच्या शारीरिक हालचालींसाठी आवश्यक पर्यायांवर मर्यादा येतात. लहान मुले व त्यांची काळजी घेणाऱ्यांसाठी शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्याच्या आयटीबीपीच्या प्रयत्नांना हातभार लावण्याची संधी मिळाल्याचा आम्हाला आनंद आहे. यायोगे सुरक्षित, सुलभ व निकोप समुदाय तयार होतील.”

आयटीडीपीच्या दक्षिण आशिया विभागाच्या प्रोग्राम लीड श्रेया गडेपल्ली म्हणाल्या, “भारतात तसेच वेगाने विकास पावणाऱ्या अनेक देशांमध्ये सातत्याने वाढत असलेल्या गुंतवणुका लहान बालके, मुले व त्यांची काळजी घेणाऱ्यांच्या गरजांवर पुरेसा भर देत नाही आहेत. या कार्यक्रमाखाली तसेच बीव्हीएलएफच्या मदतीने पुणे शहरातील वाहतूक धोरणे, योजना व प्रकल्पांमध्ये लहान मुले व त्यांच्या कुटुंबीयांच्या गरजा समाविष्ट केल्या जातील आणि पुणे हे महाराष्ट्रातील अन्य शहरांना प्रकाश दाखवणारे शहर ठरेल, अशी आशा आम्हाला वाटते.”

_MPC_DIR_MPU_II

मनपाचे कार्यकारी अभियंता दिनकर गोजारे म्हणाले, माजी मनपा आयुक्त कुणाल कुमार यांच्या मार्गदर्शना अंतर्गत पथ विभागाने अर्बन ९५ अंतर्गत विविध कामे केलेली आहेत. जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता अशा ठिकाणी बालकांना, पादचाऱ्यांना चालताना सुसह्य वाटावे अशा प्रकारे नियोजन केलेले आहे. या कामाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. शहरातील रस्ते, पदपथ विकसित करताना अर्बन ९५ अंतर्गत निकषांचा यामध्ये प्राधान्याने समावेश करीत असल्याचे त्यांनी या प्रसंगी सांगितले.

०-५ वयोगटातील मुलांसाठी शहरी वाहतूक साधनांना उत्तेजन देण्यासाठी आयटीडीपीने बीव्हीएलएफशी जागतिक स्तरावरही सहयोग केला आहे. याद्वारे लहान मुले व वाहतूक नियोजन या विषयावरील दर्जेदार संशोधने, मानके, तांत्रिक संसाधने व ज्ञानाच्या आदानप्रदानाच्या माध्यमातून बदल घडवून आणण्यासाठी निर्णयकर्ते व त्यांची अंमलबजावणी करणाऱ्यांवर प्रभाव टाकण्याचे तसेच त्यांना मदत करण्याचे काम सुरू आहे.

याप्रसंगी उपस्थित करण्यात आलेल्या विविध मुद्द्यांबाबत सविस्तर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. रुषदा मजीद, सेसिला वाका जोन्स, श्रेय गडेपल्ली, कार्यकारी अभियंता दिनकर गोजरे, आरोग्य विभागातील डॉ. मिलिंद खेडेकर यांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी मशाल संस्थेचे शरद महाजन, शेल्टर असोसिएटच्या संगीता मोरे, परिसर संस्थेचे सुजित पटवर्धन, प्रकाश पॉल, अल्लाना आर्किटेक्ट महाविद्यालयाचे विद्यार्थी व विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या प्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्वथी यांनी केले व आभार प्रदर्शन आयला यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.