Vadgaon Maval News : ‘मावळ तालुका शेतकरी बचाव कृती समितीमध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी येणाऱ्यांचे स्वागत, जाणाऱ्यांचे आभार’

समितीचे अध्यक्ष शांताराम कदम यांच्याकडून आरोपांचे खंडन

एमपीसी न्यूज – मावळ तालुका शेतकरी बचाव कृती समितीमधील राष्ट्रवादीच्या गटातील काही सदस्यांनी मागील तीन – चार दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन समितीचे अध्यक्ष आणि इतर सदस्यांवर आरोप केले. राजकारण विरहित समिती चालविण्याचे धोरण असताना काही सदस्यांनी जाणीवपूर्वक समितीमध्ये राजकारण केले आणि समितीमधून बाहेर पडले.

शेतकऱ्यांच्या हितासाठी मावळ तालुका शेतकरी बचाव कृती समिती काल होती, आज आहे, उद्याही राहील असे म्हणत समितीचे अध्यक्ष शांताराम कदम यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांचे खंडण केले. तसेच समितीमध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी येणारांचे स्वागत तर जाणारांचे आभार अशा शब्दात कदम यांनी समिती सोडणाऱ्या सदस्यांवर पलटवार केला.

सत्तेवर आल्यावर त्यांनीच समितीमध्ये राजकारण सुरू केले असून राजकीय दबावापोटीच त्यांनी समिती बरखास्त करण्याचा निर्णय घेतला असल्याचा आरोप शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष शांताराम कदम यांनी पत्रकार परिषदेत केला.

पत्रकार परिषदेस समितीचे पदाधिकारी गणेश कल्हाटकर, नथु थरकुडे, गणेश भांगरे, चंद्रकांत करपे, तानाजी येवले, बबन आगीवले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. तळेगाव एमआयडीसी टप्पा 4 मधील निगडे, आंबळे, कल्हाट व पवळेवाडी या गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन चार वर्षांपूर्वी स्थापन केलेली समिती बरखास्त करण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी जाहीर करत अध्यक्ष व काही पदाधिकाऱ्यांवर आरोप केले होते.

या पार्श्वभूमीवर आज समितीचे अध्यक्ष शांताराम कदम यांनी पत्रकारपरिषद घेऊन आरोपांचे खंडन करत शांताराम कदम म्हणाले, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी व हित जपण्यासाठी शेतकरी बचाव कृती समिती स्थापन करण्यात आली होती. एमआयडीसीमध्ये संपादन होणाऱ्या जमीन मालकांना, शेतकऱ्यांना न्याय मिळावा या हेतूने या सर्वपक्षीय समितीची स्थापना करण्यात आली होती. 10 ऑगस्ट रोजी झालेल्या आंदोलनापर्यंत सर्व पाठपुरावा या समितीच्या माध्यमातूनच झालेला आहे.

परंतु त्या आंदोलनानंतर काही सदस्यांनी समिती बरखास्त करण्याचा निर्णय जाहीर करून मनमानी कारभार व राजकिय वळण दिले जात असल्याने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. वास्तविक समितीमध्ये कधीही राजकारण आणले नाही व आतापर्यंतचा पाठपुरावा हा सर्वानुमते केलेला आहे असेही कदम यांनी स्पष्ट केले.

संबंधित पदाधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय हा राजकिय दबावापोटी घेतला असल्याचा आरोप करून 32(1) ची कार्यवाही तात्काळ करावी व ज्या शेतकऱ्यांना जमिनी द्यायच्या नाहीत त्यांच्या सातबारावरील 32(2) चे शिक्के 32(1) ची कार्यवाही होतानाच काढून टाकावेत यासाठी अखेरपर्यंत लढा देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, जे गेले त्यांचेही स्वागत व जे बरोबर येतील त्यांचेही स्वागत करून आगामी काळातही समितीच्या माध्यमातून माजी राज्यमंत्री संजय(बाळा) भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली लढा सुरू ठेवणार असल्याचे कदम यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.