Mahad News : नारायण राणे यांना जामीन, पण कोर्टाने घातल्या या अटी 

एमपीसी न्यूज : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांकडून नारायण राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र हा जमीन मंजूर करताना न्यायदंडाधिकाऱ्यांकडून काही अटी घालण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी पोलिसांनी अटक करण्यापूर्वी राणे यांनी रत्नागिरी कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, रत्नागिरी कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. तर मुंबई हायकोर्टानेही या प्रकरणात तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिल्यानं राणेंचा आजचा मुक्काम पोलीस ठाण्यात होणार का? असा प्रश्न विचारला जात होता. मात्र, न्यायदंडाधिकाऱ्यांनी जामीन मंजूर केल्यामुळे राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नारायण राणे यांना दुपारी संगमेश्वर पोलिसांनी अटक करून महाड येथे नेण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नारायण राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत महाड येथे तक्रार दाखल करण्यात आली होती. महाडसह नाशिक आणि पुणे येथेही तक्रार दाखल करण्यात आल्या असल्या तरी, महाड येथील रायगड दंडाधिकाऱ्यांसमोर नारायण राणे यांना हजर करण्यात आले. पोलिसांकडून नारायण राणे यांच्या सात दिवसांची कोठडीची मागणी केली होती. मात्र, कोर्टाने पोलिसांचा युक्तीवाद फेटाळून लावत महाड कोर्टाने नारायण राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला.

महाड कोर्टात सुमारे 20 मिनिटांपासून अधिक वेळ दोन्ही बाजूंकडून युक्तीवाद करण्यात आला. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेले वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह आहे. नारायण राणे यांचे विधान म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या घटनात्मक पदाची पायमल्ली करणारे आहेत. नारायण राणे हे केंद्रीय मंत्री असून, जबाबदार व्यक्तीने अशी विधाने करणे कितपत योग्य आहे, असा युक्तीवाद सरकारी पक्षाच्या वतीने करण्यात आला. तसेच ७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली.

नारायण राणेंच्या बाजूने कुडाळ येथील वकील संग्राम देसाई यांनी काम पाहिले. नारायण राणे यांना अटक करताना रितसर प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. नारायण राणे केंद्रीय मंत्री असून, त्यांच्याविरोधात चुकीची कलमे लावण्यात आली आहेत. तसेच अटक करण्यापूर्वी कोणतीही लेखी नोटीस दिलेली नाही, असा युक्तीवाद वकिलांकडून करण्यात आला. तसेच नारायण राणे यांची प्रकृती ठीक नाही. दुपारी डॉक्टरांनी केलेल्या तपासणीचाही दाखला यावेळी कोर्टाला देण्यात आला. अखेर पोलीस आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद फेटाळून लावत महाड न्यायालयाने नारायण राणे यांना जामीन मंजूर केला. जवळपास तासभर न्यायालयाचं कामकाज चालले.

नारायण राणे यांना जामीन मंजूर करताना महाड कोर्टाने काही अटी ठेवल्या आहेत. तसेच नारायण राणे यांचा व्हॉइस सॅम्पल घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. महाड कोर्टाने नारायण राणे यांना 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. मात्र, जामीन मंजूर करताना कोर्टाने नारायण राणे यांच्याकडून लेखी हमी घेत काही अटी ठेवल्या आहेत. नारायण राणे यांनी पुराव्यांशी कोणतीही छेडछाड करू नये. तसेच साक्षीदारांवर कोणताही दबाव आणू नये, अशा सूचना न्यायालायाने केल्या आहेत. याशिवाय, भविष्यात अशी घटना घडणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी लेखी हमी न्यायालायाने घेतल्याचे सांगितले जात आहे. या व्यतिरिक्त रायगड गुन्हे शाखेसमोर 30 ऑगस्ट आणि 13 सप्टेंबर रोजी हजेरी लावावी, असेही कोर्टाने म्हटले आहे.

राणेंना रात्री 8.30 च्या सुमारास महाड पोलीस ठाण्यात आणण्यात आले. राणे स्वत:च्या गाडीने आले होते. त्यांच्यासोबत नितेश राणे, प्रसाद लाड आणि प्रमोद जठारही होते. राणे पोहोचण्याची कुणकुण लागताच महाड पोलीस ठाण्याबाहेर राणे समर्थक आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर जमा झाले होते. यावेळी कोणताही तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.