Pimpri News : ‘रेमडेसिवीर’ची खरेदी ‘वेटिंग’वर कशामुळे ? : ‘आप’चा महापालिका आयुक्तांना सवाल

टक्केवारीसाठी रुग्णांना वेठीस धरणे हा माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार

एमपीसीन्यूज : पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनामुळे अनेक रुग्ण गंभीर स्थितीत असताना महापालिका प्रशासनाने रेमडेसिवीर इंजेक्शनची केलेली खरेदी टक्केवारी मिळत नाही म्हणून स्थायी समितीने “वेटिंग”वर ठेवल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या सर्व प्रकाराची आयुक्तांनी तातडीने चौकशी करावी व याचा खुलासा करावा, अशी मागणी आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केली आहे.

तसेच टक्केवारीसाठी रुग्णांना वेठीस धरणे हा माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार ठरेल, असा घणाघातही त्यांनी केला आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात किर्दत यांनी म्हटले आहे की, रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या संबंधिताने टक्केवारी दिली तरच खरेदीच्या खर्चाला मंजुरी देऊ, असा पवित्रा स्थायी समितीने घेतला असल्याचे म्हटले जात आहे.

त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये व कोरोना केअर्स सेंटरमध्ये दाखल गंभीर कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी शहरभर धावाधाव करावी लागत आहे.
तसेच पुण्यात जाऊन या इंजेक्शनचा शोध घ्यावा लागत आहे.

कोरोना महामारीतही स्थायी समितीने टक्केवारीसाठी बेशरमपणाचा कळस गाठल्याने राजकारण्यांमधील माणुसकी संपल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

या सर्व प्रकारची गंभीर दखल घेऊन तातडीने या प्रकाराची आयुक्तांनी चौकशी करावी व याचा खुलासा करावा. टक्केवारीसाठी रुग्णांना वेठीस धरणे हा माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार ठरेल, असा घणाघात आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.