Panvel : मावळ मतदारसंघातून अधिकाधिक मताधिक्याने निवडून येणार – पार्थ पवार

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांनी आज पनवेल मधील कामोठे परिसरात प्रचाराची सांगता केली. सकाळी कामोठे, पनवेल परिसरातून रोड शो करत पार्थ पवार यांनी मतदारांशी संपर्क साधला.

यावेळी माजी मंत्री शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांसह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

आज पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या. पार्थ पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. पिंपरी चिंचवड, मावळ, खोपोली, खालापूर, कर्जत, पनवेल, उरण ह्या संपूर्ण परिसरात मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला. प्रत्येक भागातील समस्या ह्या पार्थ पवार यांनी वैयक्तिक पणे जाणून घेतल्या. मावळ मधील सर्व समस्या सोडविण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार असल्याचे देखील त्यांनी प्रचारा दरम्यान सांगितले.

कामोठे मध्ये प्रचाराची सांगता करताना पार्थ पवार म्हणाले की, उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीपासूनच मावळ मधील प्रत्येक नागरिकाने मला भरभरून प्रेम दिले. उमेदवारी साठी मावळ मधील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आग्रह धरला होता. त्यानुसार पक्षाने माझ्यावर मावळ लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली. त्यानुसार मावळ मधील प्रत्येक भागातील समस्या जाणून घेतल्या. मतदारसंघात फिरताना बेरोजगारी ही मोठी समस्या जाणवली आणि तीच सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मावळच्या विकासासाठी येत्या 29 तारखेला घड्याळाच्या समोरील बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन देखील त्यांनी मतदारांना केले. मावळच्या जनतेवर पूर्ण विश्वास असून मावळच्या विकासासाठी मला सहाही विधानसभा मतदारसंघातून अधिकाधिक मताधिक्य मिळेल. आणि मावळची जनता मला निवडून देईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.