New Delhi : शरद पवार युपीए प्रमुख होणार का? या बाबत पवारांनी केलाय हा खुलासा

एमपीसी न्यूज : सध्या देशभरात शेतकरी आंदोलन पेटलं आहे. मोदी सरकारने केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाला असून अनेक विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी दिल्ली ला गेले आहेत. यावेळी त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुद्धा घेतल्या, त्याच दरम्यान शरद पवार हे युपीएचे अध्यक्ष होणार अश्या बातम्या रंगू लागल्या.

दरम्यान या बातमीवर खुद्द शरद पवार यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. मात्र ‘मी यूपीएचं नेतृत्व करणार या बातमीत तथ्य नाही’, असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी एका वृत्तावाहिनीशी बोलताना दिले आहे.

भाजपाविरोधी आघाडी बळकट करण्यासाठी शरद पवार यांच्या नावाचा विचार होत असल्याचे सांगण्यात येत होते. देशात राजकीय पर्याय उभा करण्यासाठी गांधी कुटुंब एक पाऊल मागे घेणार, अशी चर्चा होती. केंद्रात विरोधी पक्षनेते म्हणून शरद पवार यांनी याआधीही काम केले आहे.

सध्या देशातील विविध राज्यांत भाजपाचे वाढलेले वर्चस्व आणि युपीएची कमी आक्रमकता लक्षात घेऊन हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र शरद पवारांनी या बातम्यात काही तथ्य नसल्याचे सांगत सर्व दावे फेटाळून लावले आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसच्या अध्यक्षपदाचीही निवड रखडली आहे. सध्या सोनिया गांधी यांच्याकडेच काँग्रेसचे आणि युपीएचे नेतृत्व आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.