Pimpri : विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या 26 दिवसांत ‘सारथी’वर 529 तक्रारी

तक्रारींचे प्रमाण कमी झाल्याचा पाणीपुरवठा विभागाचा दावा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने 20 ऑगस्टपासून आठवड्यातून विभागनिहाय एक दिवस पाणीकपात लागू केल्यापासून  26 दिवसांमध्ये विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या सारथी हेल्पलाईनवर 529 तक्रारी नोंदविल्या गेल्या आहेत. दिवसाला सरासरी 21 ते 23 तक्रारी प्राप्त होत आहेत, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम यांनी दिली. आठवड्यातून एक दिवस पाणी कपात लागू केल्यानंतर तक्रारींचे प्रमाण कमी झाल्याचेही त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरवासियांची तहान भागविणारे पवना धरण 100 टक्के भरले आहे. धरणात 100 टक्के पाणी असतानाही पावसाळ्यातच शहरवासियांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. महापालिका इतिहासात प्रथमच शहरवासियांवर बारामाही पाणी कपात सहन करण्याची वेळ आली आहे. 1 मार्च 2019 पासून लागू केलेली पाणीकपात महापालिकेने 7 ऑगस्टपासून मागे घेतली. दररोज पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, पाणी कमी आणि मागणी जास्त असल्याने पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. पाणीपुरवठ्याच्या तक्रारींची संख्या पाहता महापालिकेने पाणी कपात मागे घेत 19 ऑगस्टपासून पुन्हा आठवड्यातून विभागनिहाय एक दिवस पाणी कपात सुरू केली आहे. त्यानंतर तक्रारींचे प्रमाण कमी झाले आहे.

पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम म्हणाले, महापालिकेने 20 ऑगस्ट 2019 पासून विभागनिहाय आठवड्यातून एक दिवस पाणीकपात लागू केली आहे. मागील 26 दिवसांत महापालिकेच्या सारथी हेल्पलाईनवर 529 तक्रारी नोंदविल्या गेल्या आहेत. दिवसाला सरासरी 21 ते 23 तक्रारी प्राप्त होत आहेत. महापालिकेकडून 7 ते 19 ऑगस्ट या कालावधीत दररोज पाणी पुरवठा केला जात होता. त्यावेळी दिवसाला सरासरी 25 ते 30 तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यामुळे आठवड्यातून एक दिवस पाणी बंद केल्याने तक्रारी कमी झाल्या आहेत.

सारथी हेल्पलाईनवर पाणी पुरवठा विषयक येणाऱ्या तक्रारींची संख्या जास्त दिसत असली. तरी, एकच नागरिक दोन-तीन वेळा तक्रारी करतात. दररोज पाणी पुरवठ्याच्या वेळी होणाऱ्या तक्रारींचे प्रमाण आठवड्यातून एक दिवस पाणी कपात लागू केल्यानंतर कमी झाले आहेत. आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवले जात असल्याने तांत्रिक अडचणी देखील कमी येतात, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.