Chinchwad News : शब्द हे शस्त्रांपेक्षाही तीक्ष्ण असतात – गिरीश प्रभुणे

एमपीसी न्यूज – शब्द हे शस्त्रांपेक्षाही तीक्ष्ण असतात; परंतु त्यांचा प्रभावीपणे वापर करून सुरेश भट यांच्यासारख्या प्रतिभावंत गझलकाराने मानवी भावनांचे उदात्त दर्शन घडविले आहे, असे विचार पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले.

पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे रविवारी (दि.5) शब्दधन काव्यमंच आयोजित गझलसम्राट सुरेश भट पुरस्कारांचे वितरण प्रभुणे यांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुरडे अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. पी. एस. आगरवाल, मधुश्री ओव्हाळ यांची व्यासपीठावर तसेच शब्दधन काव्यमंचाचे संस्थापक-अध्यक्ष सुरेश कंक यांच्यासह शहरातील अनेक साहित्यिकांची श्रोत्यांमध्ये उपस्थिती होती.

Pune Crime News : चोरी करण्यासाठी आले; मात्र महिलेचा रुद्रावतार पाहून चोर गेले पळून

याप्रसंगी गझलकारा मीना शिंदे यांना गझलसम्राट सुरेश भट पुरस्कार आणि दिनेश भोसले, प्रशांत पोरे, संदीप जाधव यांना गझलसम्राट सुरेश भट युवा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, शाल, ग्रंथ असे पुरस्कारांचे स्वरूप होते. नुकतेच दिवंगत झालेले ज्येष्ठ गझलकार कमलाकर देसले यांना श्रद्धांजली अर्पण करून आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षाला पाणी घालून सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला.

शब्दधनचे उपाध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून पुरस्कारार्थींच्या भावना जाणून घेण्यात आल्या. अध्यक्षीय मनोगतातून नंदकुमार मुरडे यांनी, “गझल हा कवितेतील महत्त्वाचा आकृतिबंध असून एकाच वेळी भावभावना, वस्तुस्थिती अन् स्वप्नरंजन यांचा समर्थ आविष्कार गझलेच्या द्विपदीतून होत असतो!” असे मत मांडले.

पुरस्कार सोहळ्यानंतर पुरस्कारार्थी गझलकारांसह रघुनाथ पाटील, चंद्रकांत धस, सुहास घुमरे यांनी स्वरचित मराठी गझलांचे बहारदार सादरीकरण केले. अरुण परदेशी, शामराव सरकाळे, मुरलीधर दळवी, फुलवती जगताप, नितीन हिरवे, अण्णा जोगदंड यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. नंदकुमार कांबळे यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.