World No Tobacco Day : निरोगी राहण्यासाठी व्यसनापासून दूर राहा – कर्करोग तज्ज्ञ  डॉ. रेश्मा पुराणिक

एमपीसी न्यूज – भारताबरोबर इतर ही देशांमध्ये तंबाखूचे सेवन करणे हे एक फॅशन मानली जाते तर काही जण टेन्शन पासून दूर राहण्यासाठी, वेळ घालवण्यासाठी, धुंदीत राहण्यासाठी तसेच एक छंद म्हणून धूम्रपान करतात. तंबाखू सेवनाचे प्रकार आपणास माहित असतील त्यामध्ये प्रमुख रित्या तंबाखू व चुना मिश्रण चघळणे, दातांना मिश्री लावणे, तंबाखूयुक्त पान चघळणे, सिगरेट ओढणे, हुक्का, चिलीम, गुटखा,बिडी, खैन्नी आदी प्रकारातून लोक त्याचे सेवन करतात.

धूम्रपानामुळे होणाऱ्या आजारांविषयी काही प्रमाणात जागरुकता आहे. लोकांना त्यांच्या सेवनाचे परिणामांची सुद्धा कल्पना आहे, पण दुर्लक्ष हे मोठे शस्त्र ते बाळगतात याच कारणामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम घडतात. हे त्यांना शेवटी लक्षात येते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. कोणत्याही प्रकारे तंबाखू सेवन आरोग्यास हानिकारकच आहे. ह्याबद्दल समाज जाणीव, शासनाचे कडक निर्बंध व त्याबाबत जागरुकता निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे. यात प्रामुख्याने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे फारच महत्त्वाचे आहे. आत्ताच्या काळात नवनवीन आजार आलेले आहेत आणि पुढे ही हे आजार निर्माण होतील त्याचा सामना करण्यासाठी आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी व्यसनापासून दूर राहणे ही काळाची गरज आहे.

तंबाखूच्या सेवनाच्या धोक्यांबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने 31 मे हा जागतिक तंबाखू दिन म्हणून घोषित केलेला आहे. तंबाखूच्या सेवनाने दरवर्षी जगभरात 80 लाख लोकांचा मृत्यू होतो त्यापैकी 70 लाख हे थेट धुम्रपानांमुळे आणि दहा लाखाहून अधिक लोक निष्क्रीय धुम्रपानांमुळे (Passive Smoking) मरतात. तंबाखूमुळे दर सहा सेकंदात एका व्यक्तीचा मृत्यू होतो.

तंबाखूमध्ये निकोटिन नावाचा एक अत्यंत व्यसनाधीन करणारा पदार्थ असून त्याबरोबर कर्करोगास कारणीभूत ठरणारी इतर हानिकारक रसायने देखील असतात. लोक विविध प्रकारांमध्ये तंबाखूचे सेवन करतात. जगातील 8 मृत्यूच्या कारणांपैकी 6 कारणं ही तंबाखूशी निगडित आहेत. जसे की हृदयरोग, दमा, कर्करोग आणि स्ट्रोक इत्यादी.

तंबाखूमुळे तोंडाचा, फुफ्फुस, पोटाचा, अन्ननलिकेचा तसेच स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. तुमच्या धुम्रपानामुळे तुमच्या कुटुंबाला पण निष्क्रिय धूम्रपानाचा त्रास होऊ शकतो. धूम्रपान करणारी व्यक्ती त्याच्या उत्पन्नापैकी साधारणपणे 5 – 15 टक्के उत्पन्न हे धूम्रपान करण्यावर खर्च करते. तंबाखूमुळे माणसांच्या आपापसातल्या संबंधावर परिणाम होतो आणि त्या व्यक्तीचा सामाजिक, आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या नाश होतो.

तंबाखू सोडल्यामुळे आयुर्मान वाढते आणि तंबाखूमुळे होणाऱ्या रोगांचा धोका कमी होतो. व्यक्तीने धूम्रपान सोडल्यावर त्याला डोकेदुखी, निद्रानाश, मनःस्थिती बदलणे, धूम्रपानाची इच्छा होणे यासारखी लक्षणं दिसून येतात. तंबाखू सोडल्यामुळे जर तुम्हाला वरचे लक्षणं दिसत असतील तर डॉक्टरांकडे वर्तन उपचार (Behavioral Therapy) आणि Nicotine Replacement Therapy साठी सल्ला घ्यावा. लक्षात ठेवा, धूम्रपान घातक आहे. म्हणूनच आज धूम्रपान सोडण्याचा निश्चय करा आणि त्याच्या पासून दूर राहा. आपले सामाजिक, आर्थिक, कौटुंबिकहित साध्य करा.

तंबाखूच्या निर्मूलनासाठी सामाजिक समर्थनाची नितांत गरज आहे. निव्वळ कायदे करून प्रश्न सुटणारा नाही, तर समाजातील घटकाने याची जाणीव करून घेऊन दुसऱ्यांनाही त्याची जाणीव करून देणे गरजेचे आहे. त्या बरोबरच आपल्या आरोग्य सुधारणे हे ही महत्त्वाचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.