World Tigers Day: जगातील वाघांच्या एकूण संख्येपैकी 70 टक्के वाघ भारतात

World Tigers Day: 70% of the world's tigers are in India देशभरातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये एकूण वाघांची संख्या 2967 इतकी आहे. तर महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये 312 वाघांची संख्या आहे.

एमपीसी न्यूज- भारतामध्ये जैवविविधतेचे 8 टक्के प्रमाण आहे. वृक्ष, निसर्ग, वन्यजीवन वाचवण्याची आणि जतन करण्याची भारतीय संस्कृती आहे. जगातील वाघांच्या एकूण संख्येपैकी 70 टक्के वाघ भारतात आहेत. ही भारतासाठी प्रशंसनीय बाब आहे.

‘जागतिक व्याघ्र दिना’च्या पूर्वसंध्येला केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावेडकर यांनी देशभरातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये असणाऱ्या वाघांच्या जनगणनविषयीचा सविस्तर अहवाल मंगळवारी (दि.28) दिल्ली मधील राष्ट्रीय मीडिया सेंटर येथे प्रकाशित केला. या अहवालातून हा सकारात्मक निष्कर्ष समोर आला आहे.

देशभरातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये एकूण वाघांची संख्या 2967 इतकी आहे. तर महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये 312 वाघांची संख्या आहे. चौथ्या अखिल भारतीय वाघ जनगणनाच्या अहवालात ही आकडेवारी समोर आली आहे.

‘वाघ’ हा जंगलाचा राजा असून निसर्गाचे समतोल राखण्यासाठी जंगलाचा महत्त्वाचा घटक समजला जातो. वाघांची वाढती संख्या पर्यावरणात समतोल असल्याचे दर्शविते. वाघ आणि इतर प्राण्यांची वाढती संख्या हे भारताला जागतिक पटलावर महत्त्वपूर्ण स्थान मिळवून देण्यात भूमिका निभावू शकतात.

मानव आणि प्राण्यांचा संघर्ष टाळण्यासाठी जंगलांमध्ये पाणी व चारा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यासाठी प्रथमच लिडर सेन्सरचा वापर केला जाईल, अशी माहिती मंत्री जावडेकर यांनी यावेळी दिली.

चौथ्या अखिल भारतीय व्याघ्र अनुमानाचा तपशीलातील महत्त्वाचे मुद्दे –

# इतर प्राणी आणि प्रजातींच्या विपुलता निर्देशांक दर्शविण्यात आला आहे.

# सर्व कॅमेरा ट्रॅप साइटमधून प्रथमच सर्व वाघांचे लिंग प्रमाण केले गेले.

# मानव वंशविषयक तपशीलांचा वापर वाघांची लोकसंख्या मोजण्यासाठी करण्यात आला.

# व्याघ्र प्रकल्पातील रचनेत वाघांचे असणारे प्रमाण काढण्यात आले.

भारतात वाघांची संख्या आता 2967 आहे. जी जगातील वाघाच्या लोकसंख्येच्या तुलनेत 70 टक्के आहे. झालेल्या सर्वेक्षणामध्ये सर्वाधिक कॅमेराचे जाळे पसरवून सर्वेक्षण करण्यामध्ये भारताने जागतिक विक्रम नोंदविला केला आहे.

राज्यातील व्याघ्र प्रकल्पांमधील वाढती वाघांची संख्या

आज प्रकाशित झालेल्या अहवालामध्ये महाराष्ट्रात असणाऱ्या 6 व्याघ्र प्रकल्पांमध्ये एकूण 312 वाघांची संख्या नोंदविण्यात आली आहे. यापूर्वीच्या प्रसिद्ध अहवालामध्ये 2006 मध्ये ही संख्या 103, 2010 मध्ये 168, 2014 मध्ये 190 आणि आता 2018-19 च्या सर्वेक्षणामध्ये हा आकडा वाढून 312 झाला असल्याचे नोंदविण्यात आले आहे. यामुळे भविष्यात व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन क्षेत्रात वाढ होईल, अशी आशा पल्लवित होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.