World Update : आनंदाची बातमी ! ओझोनचा थर पूर्ववत होतोय

एमपीसी न्यूज – जगात कोरोना या विषाणूने थैमान घातले असून, सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. मात्र, विज्ञान विश्वातून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पृथ्वीचा अल्ट्रावायलेट किरणांपासून बचाव करणारा ओझोनचा थर हळूहळू पूर्ववत होत आहे. ओझोनच्या थराला अपायकारक ठरणाऱ्या पदार्थांच्या अतिवापरामुळे ओझोनच्या थराला छिद्र पाडल्याच्या बातम्या आपण यापूर्वी ऐकल्या होत्या. 1987 च्या मॉन्ट्रियल प्रोटोकॉल या करारानुसार ओझोन थराला अपाय ठरणाऱ्या वस्तूंच्या निर्मितीवर बंदी घालण्यात आली होती. या करारामुळे हा बदल झाल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

ओझोन थराला अपायकारक ठरणाऱ्या कार्बन फ्लोर कार्बन अर्थात ‘सीएफसी’ व इतर अपायकारक पदार्थांच्या वापरामुळे ओझोनच्या थराला दिवसेंदिवस छिद्र पडायला लागले होते. मानवी शरीराला व पृथ्वीला धोकादायक असणाऱ्या अल्ट्रावायलेट किरणांपासून बचाव करण्यासाठी ओझोन थराची महत्वपूर्ण भूमिका असते. या थराला छिद्र पडायला लागल्यामुळे विज्ञान विश्वात मोठे चिंतेचे वातावरण होते. हे छिद्र आपोआप भरून येत असल्याने आनंद व्यक्त व्यक्त केला जात आहे.

कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठाच्या सीआयआरईएस व्हिजिटिंग फेलो अंतरा बॅनर्जी यांच्या मतानुसार, दक्षिणी गोलार्धात हवामानात बदल होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विशेषत: हवा अभिसरण पद्धतींमध्ये बदल झाल्याचे दिसून येत आहे. हा हवेत झालेला बदल ओझोन थराला पडलेल्या छिद्राचे आकुंचन होण्याचे संकेत आहेत. हा दिसणारा बदल मॉन्ट्रियल प्रोटोकॉलमुळे झाला असल्याचे त्यांचे मत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.