Lonavala : घरोघरी ज्येष्ठा गौरींचे मनोभावे पूजन

एमपीसी न्यूज – गौरी गणपती उत्साहात गुरुवारी गौरीचे घरोघरी आगमन झाले. आज महिलांनी गौरीची मनोभावे पूजन करत लक्ष्मी घेतल्या. मोठ्या उत्साहात सर्वत्र गौरी पूजन करण्यात आले.
वर्षभरापासून ज्यांच्या आगमनाची आस भाविक भक्तांना असते त्या लाडक्या गणरायाचे सोमवारी आगमन झाले. सार्वजनिक गणेश मंडळांसह घराघरात बाप्पांचे आगमन झाल्याने सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान मोठे सर्वच बाप्पांच्या सेवेत कसलीही कमी राहणार नाही याची काळजी घेतात. गुरुवारी गौरीचे आगमन झाले. महिलांनी मोठ्या आनंदाने घरात गौरीचे पूजन केले. माहेरवाशिणी असलेल्या गौरीचे लाड पुरविण्यात कोणतीही कमी राहणार नाही याची महिला वर्गाकडून दक्षता घेतली जात होती.
गौरीसाठी घरोघरी खास स्वादिष्ट फराळ बनविण्यात आला होता. काही ठिकाणी बाजारातून तयार फराळ आणण्यात आला होता. ग्रामीण भागात लक्ष्मी घेण्याची प्रथा असल्याने महिलांनी साज शृगांर करत बाप्पा व गौरीच्या समोर बसून गौरी घेतल्या. सर्वत्र गणपती व गौरीच्या गाण्यांनी परिसर दणाणून सोडला होता. नानाविध आकारांच्या गौरींना आकर्षक साडी व दागिन्यांनी सजविण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.