Hinjwadi : काळ भैरवनाथ उत्सवातील कुस्ती आखाडा बरोबरीत; मल्ल चेतन कंधारे व आकाश रानवडे यांना विभागून ७५ हजारांचे बक्षीस

भोईरवाडी (माण) : दोनशे मल्लांचा सहभाग

एमपीसी न्यूज –  भोईरवाडीचे (माण) ग्रामदैवत काळ भैरवनाथ महाराजांचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. उत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या भव्य कुस्ती आखाड्याला तब्बल दोनशे मल्लांनी सहभाग नोंदविला. शेवटची अटीतटीची कुस्ती बरोबरीत सुटल्याने या दोनही मल्लांना ७५ हजारांचे पारितोषिके विभागून देण्यात आले.  

जिल्हा परिषद प्राथमिक शाळे शेजारील भव्य कुस्ती आखाड्यात कुस्त्यांना प्रारंभ झाला. तब्बल दोनशे मल्लांच्या शंभर निकाली कुस्त्या झाल्याने कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. पाचशे ते ७५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक व ग्रामस्थांच्या भरघोस रोख रकमेच्या बक्षिसांची लयलूट मल्लांनी केली. शेवटची कुस्ती सह्याद्री कुस्ती संकुलाच्या चेतन कंधारे व रुस्तम ए हिंद अमोल बुचडे अकादमीच्या आकाश रानवडे यांच्यात झाली. तब्बल अर्धा तास डाव प्रतिडाव रंगला अखेर पंचानी ती बरोबरीत सुटल्याचे जाहीर केल्याने ७५ हजारांचे रोख बक्षीस मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आले.

या जंगी आखाड्याला जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, तालुकाध्यक्ष नंदकुमार भोईर, निलेश भोईर, शंकर भोईर, विश्वनाथ भोईर, अंकुश तुपे, तुकाराम सावंत, तुकाराम भोईर, अनिल मोळक, वासुदेव भोईर, लहू तुपे, मोरया सावंत, सर्जेराव भोईर आदी मान्यवरांसह आयटी अभियंते तरुण तरुणींनी गर्दी केली होती. आत्माराम भोईर, बाळू बालवडकर, बबूशा हरगुडे यांनी पंचाची जबाबदारी पार पाडली.

आयटी पार्क माण पट्ट्यातील डोंगराच्या कुशीत वसलेल्या भोईरवाडीत उत्सवानिमित्त सप्ताह आणि दोन दिवस भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ७ तारखेला सकाळी ७ वाजता अभिषेक व महापूजा झाली. यानंतर होम-हवन, दुपारी सामूहिक भजन व हरिपाठ, सायंकाळी ६ वाजता देवाचा छबिना व पालखीची मिरवणूक झाली. यानंतर रात्री १० ते पहाटे ४ पर्यंत जगणकुमार सह हौसा वेळवंडकर यांचा लोकनाट्य तमाशा झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.