Pimpri : अंगावर थुंकी उडाल्याने तरुणाला मारहाण करत लुटले

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी चालत जात असताना थुंकी उडाल्याने चिडलेल्या दोघांनी मिळून तरुणाला मारहाण केली. तसेच तरुणाच्या खिशातून सहा हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. ही घटना रविवारी (दि. 14) रात्री साडेदहाच्या सुमारास पिंपरी येथे घडली.
रोहित बाबासाहेब सरवदे (वय 25, रा. बौध्दनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार नितुल पवार (वय 30), समीर शेख (वय 28, दोघे रा. पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. तिघेजण रस्त्याने पायी चालत जात होते. पिंपरी मधील सोलापूर बँकेसमोर आले असता रोहित यांची थुंकी आरोपींच्या अंगावर उडाली. त्यावरून दोघांनी मिळून रोहित यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच रोहित यांच्या खिशातून जबरदस्तीने सहा हजार रुपये काढून घेतले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.