Pimpri : ओला, सुका आणि घातक कचरा वेगळा करण्याचे सुयोग्य नियोजन करा; महापौर जाधव

एमपीसी न्यूज – शहरातील कचरा संकलन आणि वहनासाठी कचरा वाहतूक गाड्यांची संख्या वाढवून फे-या वाढवाव्यात. ठिकठिकाणी कचरा न टाकण्याचे आवाहन करणारे फलक लावावेत. ओला व सुका कचरा वेगळे करण्याचे सुयोग्य नियोजन करण्याच्या सूचना महापौर राहुल जाधव यांनी अधिका-यांना दिल्या आहेत. तसेच सर्व भागांत समान पाणीपुरवठा करण्यात यावा. शाळांचा परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा. महापालिकेच्या ताब्यातील मोकळ्या जागांवर कुंपणालगत वृक्ष लागवड करण्याच्या सूचनाही त्यांनी उद्यान विभागाला केली.

प्रभागस्तरावरील अडचणी व विकास कामांबाबतच्या आढावा बैठक महापौर जाधव घेत आहेत. ‘क’ प्रभागाची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, प्रभाग अध्यक्षा यशोदा बोईनवाड, शहर सुधारणा समिती सभापती राजेंद्र लांडगे, नगरसेविका नम्रता लोंढे, गीता मंचरकर, प्रभाग समिती स्वीकृत सदस्य गोपीकृष्ण धावडे, सागर हिंगणे, वैशाली खाडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके, आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफळे, कार्यकारी अभियंता संजय घुबे, रवींद्र पवार, नितीन देशमुख, प्रदीप पुजारी, प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर,आर.एम. घुले, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे बैठकीला उपस्थित होते.

स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी म्हणाले, ”कचरा वाहन मॉनीटरिंग करणारे अॅप विकसित करून सर्व नगरसेवकांना द्यावे. जेणेकरून त्यांना प्रभागातील कचरा वाहक गाड्यांची सर्व माहिती मिळणे शक्य होईल. तसेच कचरा वाहनांच्या रूट प्लॅनचे पत्रक प्रभागातील नगरसेवक, संबधित अधिकारी यांच्या मोबाईल नंबरसह नागरिकांना घरोघरी वाटावे. कचरा वाहनांच्या फे-या वाढविण्यात याव्यात. वृक्षलागवडीबाबत सर्व सदस्यांना माहिती द्यावी. रस्त्यावरील खड्डे योग्य पद्धतीने तत्काळ बुजविण्यात यावेत”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.