Chikhali : एटीएममध्ये कॅश नव्हती, म्हणून बँकेने पोलिसांना एटीएम फोडल्याची माहितीच दिली नाही

एमपीसी न्यूज – तळवडे परिसरात आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडल्याचा प्रकार गस्तीवरील पोलिसांच्या आज, मंगळवारी (दि. 19) पहाटे निदर्शनास आला आहे. ही घटना 23 ऑक्टोबर रोजी घडली असून एटीएममध्ये कॅश नसल्याने बँकेच्या अधिका-यांनी महिना उलटून देखील पोलिसांना कळविण्याची तसदी घेतली नाही. बँकेचा निष्काळजीपणा यामुळे समोर आला आहे.

मागील आठवड्यात चिखली येथे ऍक्सिस बँकेचे एटीएम फोडल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी अतिरिक्त गस्तीचे आदेश दिले. त्यानुसार, शहरात रात्रीच्या वेळी अतिरिक्त गस्त घालण्यात येत आहे. तळवडे येथे आयडीबीआय बँकेचे एटीएम आहे. मंगळवारी पहाटे पोलीस या परिसरात गस्त घालत असताना त्यांना एटीएमचा संशय आला. त्यामुळे पोलिसांनी आतमध्ये जाऊन पाहणी केली असता एटीएम गॅस कटरने फोडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसले.

ही घटना 23 ऑक्टोबर रोजी घडली आहे. मात्र, एटीएममध्ये रोकड नसल्याने बँकेने पोलिसांना कळविण्याची तसदी घेतली नाही. मागील एक महिन्यापासून हे एटीएम बंद असल्याचे बँक अधिका-यांनी पोलिसांना सांगितले आहे. मागील आठवड्यात देखील चिखली परिसरातील ऍक्सिस बँकेचे एटीएम फोडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती देखील बँकेच्या अधिका-यांनी तब्बल 36 तासानंतरही पोलिसांना दिली नव्हती. एटीएमच्या सुरक्षेबाबत बँका उदासीन असल्याचे यावरून दिसून येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.