Pune : चार हजार उर्दू प्राथमिक विद्यार्थ्यांना ‘टॅब’ आणि ‘उर्दू ई -लर्निंग ‘ सॉफ्टवेअरची भेट 

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘पी. ए. इनामदार आयसीटी अकॅडमी ‘तर्फे पुणे शहरातील उर्दू माध्यमातील 4 हजार विद्यार्थ्यांना टॅब आणि उर्दू ई -लर्निंग ॲनिमेटेड सॉफ्टवेअरची भेट देण्यात आली. यामुळे उर्दू माध्यमाच्या 4 हजार प्राथमिक विद्यार्थ्यांना ‘टॅब’ आणि ‘उर्दू ई -लर्निंग ‘ सॉफ्टवेअर द्वारे प्रगतीचे पंख लाभले आहेत ! उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी संशोधित करण्यात आलेला भारतातील हा पहिलाच सॉफ्टवेअर उपक्रम आहे.

शिक्षण उपसंचालक आणि पुणे पालिकेच्या शिक्षण अधिकारी मीनाक्षी राऊत या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार हे होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार, सचिव लतीफ मगदूम,तनवीर इनामदार, मुंबईच्या इत्तेहाद स्कूलचे विश्वस्त सिद्दीकी, नासिर खान हे देखील या कार्यक्रमात उपस्थित होते. महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘पी. ए. इनामदार आयसीटी अकॅडमी ‘ च्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या आणि आझम कॅम्पसमधील शाळांच्या मिळून एकूण 4 हजार विद्यार्थ्यांना हे उर्दू ॲनिमेटेड ई लर्निंग सॉफ्टवेअर आणि टॅब मोफत दिले गेले.

हाजी गुलाम मोहम्मद आझम एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त तनवीर इनामदार यांनी हे सॉफ्टवेअर तयार केलेले आहे. सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी आझम कॅम्पस मधील शिक्षकांनी कंटेन्टची मदत केली आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता आझम कॅम्पसच्या असेम्ब्ली हॉलमध्ये विशेष कार्यक्रमात या सॉफ्टवेअर चे लोकार्पण करण्यात आले.

मीनाक्षी राऊत म्हणाल्या, “2020 मध्ये भारत महासत्ता करताना मनुष्यबळ निर्मिती हे आव्हान असणार आहे. वंचित, सामाजिक मागास वर्गाला सक्षम करणे आवश्यक असणार आहे. उर्दू माध्यमातून ई -लर्निंग अॅनिमेटेड सॉफ्टवेअर आणि टॅब देणे हा या विद्यार्थांच्या सक्षमीकरणासाठी महत्वाचा उपक्रम ठरू शकतो. तासंतास व्हीडीओ गेम,पबजी खेळणाऱ्या पिढीवर दुष्परिणाम होत आहे. हा तंत्रज्ञानाचा दुरुपयोग आहे.तंत्रज्ञानाचा ई लर्निंगमध्ये उपयोग करुन अभ्यासाची गोडी वाढवणे महत्वाचे आहे. सर्व अभ्यास टॅब द्वारे हातात आल्यावर विद्यार्थी सक्षम होतीलच, पण, शिक्षकांनाही ज्ञानाने अद्ययावत अपडेट व्हावे लागेल ”

डॉ.पी. ए. इनामदार म्हणाले, “गरीब, झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांना टॅब देण्याने देशभरात प्रगतीचे वारे सुरू होईल. कमी बोलून जास्त काम करण्यावर भर दिला पाहिजे.तंत्रज्ञानाच्या वापराने मनुष्याची उमेद वाढवण्याचे काम आपण केले पाहिजे”

यापूर्वी, महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या 27 शाळांमध्ये ‘पी. ए. इनामदार कॉम्प्युटर लॅब ‘ स्थापन करण्यात आल्या असून तेथील गरीब विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण ,इंग्रजी संभाषण ,टायपिंग, हार्डवेअर दुरुस्ती शिकवली जाते.
हे विद्यार्थी एमएस-सीआयटी,ट्रीपल -सी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती ‘पी .ए. इनामदार आयसीटी अकॅडमी ‘च्या संचालक मुमताज सय्यद यांनी दिली.

शमीम खान यांनी आभार मानले. रोशन आरा यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like