Pimpri : कंत्राटी साफसफाई महिला कामगारांचा पिंपरी चिंचवड महापालिकेवर मोर्चा

एमपीसी न्यूज – कष्टकरी कामगार पंचायतीच्या वतीने कंत्राटी पद्धतीने साफसफाई काम करणाऱ्या महिलांनी आपल्या मागण्यांसाठी सोमवारी (दि. 2) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य इमारतीवर मोर्चा काढून आंदोलन केले.

_MPC_DIR_MPU_II

कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सर्वजीत बनसोडे, शहराध्यक्ष संजीवन कांबळे, महेंद्र सरोदे, रविकिरण बनसोडे, राम बनसोडे, कोषाध्यक्ष प्रल्हाद कांबळे, कार्याध्यक्ष बळीराम काकडे, दत्तात्रय शिंदे तसेच सुमारे दीडहजार महिला स्वच्छता कर्मचारी सहभागी झाले होते. समान वेतन, किमान वेतन, आरोग्य विमा सारख्या मूलभूत सुविधा लागू कराव्यात, तीन महिन्यापासून थकीत असलेला पगार देण्यात यावा या मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. कायमस्वरूपी कामावर घेतलं पाहिजे महापालिकेच्या योजनेमध्ये हक्काचे घरकुल मिळालेच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. मोर्चा महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर अडवण्यात आला.

यावेळी बाबा कांबळे म्हणाले, “पिंपरी-चिंचवड शहरात पंधराशे महिला कंत्राटी पद्धतीने साफसफाई कामे करत आहेत या महिलांना किमान समान वेतन आणि कामगार कायद्याप्रमाणे दिल्या जाणाऱ्या कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत. तसेच गेल्या अनेक महिन्यापासून पगार देखील दिला जात नाही. या महिलांनी त्यांचे पासबुक त्यांचे एटीएम कार्ड ठेकेदाराने स्वतःकडे ठेवली असून तेथे त्यांचा दुरुपयोग करून त्यांचा पगार काढला जात आहे. याबद्दल महापालिका अधिकाऱ्यांना कळवून देखील यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही यामुळे संबंधित अधिकारी आणि सत्ताधारी पक्षातील काही मंडळी या प्रकाराला पाठीशी घालत असून यांच्या संगनमताने हा सर्व प्रकार सुरू आहे” पुढील काळात का प्रश्न सुटला नाही तर हा लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा बाबा कांबळे यांनी दिला. सर्वजीत बनसोडे, संजीवन कांबळे, प्रल्हाद कांबळे यांनी मार्गदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.