मार्चपासून सोमवारी आणि शुक्रवारी आयटीयन्ससाठी हिंजवडी ते बारामती खास बससेवा

एमपीसी  न्यूज – हिंजवडीतील आयटी कंपनीतील तरुणवर्गाच्या सोयीसाठी आठवड्याच्या सुरुवातीला आणि आठवड्याच्या शेवटी म्हणजेच दर सोमवारी आणि शुक्रवारी हिंजवडी ते बारामती बससेवा सुरू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

येत्या 3 मार्चपासून ही सेवा सुरू होणार आहे. दर शुक्रवारी हिंजवडी ते बारामती व दर सोमवारी बारामती ते हिंजवडी अशा मार्गाने या बस सोडण्यात येणार आहेत. आयटीचे माहेर घर म्हणून ओळखल्या जाणार्‍या हिंजवडी येथे बारामती भागातील अनेक तरुण नोकरीसाठी येतात. यातील बहुतांश तरुण दर आठवड्याला गावी जातात. त्यामुळे हिंजवडी ते बारामती बससेवा सुरू करण्याची मागणी होती. ही मागणी पूर्ण झाल्याने बारामतीकरांना याचा फायदा होणार आहे.



कोल्हापूर, नाशिक, मुंबई व औरंगाबाद या भागांतील तरुण मोठ्या संख्येने हिंजवडीतील कंपन्यांमध्ये नोकरी करतात. त्यामुळे या भागातील नागरिकांची मागणी लक्षात घेत एसटी महामंडळाने या शहरांपासून ते हिंजवडीपर्यंत बससेवा सुरू केली आहे. या पार्श्‍वभूमीवर बारामती ते हिंजवडी बससेवा सुरू करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत होती. त्यानुसार एसटी महामंडळाने ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.