चोरट्यांच्या टोळीच्या अफवांनी उडविली चाकणकरांची झोप; नागरिकांसह पोलिसही त्रस्त

(अविनाश दुधवडे)

लांडग्याच्या कथेतील प्रसंग उद्भवण्याची शक्यता

एमपीसी न्यूज – चाकण पंचक्रोशीत आणि तालुक्याच्या पश्चिम भागात मागील काही दिवसांत घडलेल्या चोरीच्या घटनांनंतर चोरांची मोठी टोळी रात्रीच्या वेळी येत असल्याच्या अनेक अफवांना ऊत आला आहे. या अफवांचा धसका महिला वर्गासह सर्वांनीच घेतला असून, रात्रीच्या वेळी सहसा घराबाहेर पडण्यासही कुणीही तयार होत नसल्याचे चित्र आहे. चाकण लगतच्या राक्षेवाडी (ता.खेड) मध्ये चोर आल्याच्या अफवा पंचक्रोशीत पसरत आहेत. त्यामुळे सर्वत्र ग्रामीण भागातील ग्रामस्थांनीच रात्रगस्त सुरू केली आहे.

अफवांचा खूप मोठा बाजार झाला असला तरी प्रत्यक्षात चोरांची टोळी कुणी पाहिलेली नाही. मात्र, चाकण परिसरातील सर्व वाड्या -वस्त्यांसह खेड तालुक्याच्या पश्चिम भागात आणि लगतच्या अख्ख्या मावळ तालुक्यात चोरांच्या टोळीच्या अफवेने नागरिकांसह खुद्द पोलिसांचीही झोप उडवली आहे. चाकण परिसरातील गावागावात गस्त सुरू झाली आहे. चाकणच्या पश्चिमेकडील विविध गावांमध्ये चोर दिसल्याची अफवा सातत्याने उठत आहे. कल्पनेतील चोरांच्या टोळीचे चित्र थोड्याफार फरकाने सर्वत्र चर्चांमध्ये रंगविले जात आहे.

चाकण एमआयडीसी भागातील रहदारीच्या रस्त्यावर वाटमारीच्या अफवांना अक्षरश: ऊत आला आहे. कोण म्हणते आमच्या घरावर दगड पडले, कोण म्हणते आमच्या घराचे दार वाजवले, कुणी सांगतात आम्ही रात्री चोर पहिले, तर काही मंडळी वाहने चोरीला गेल्याच्या अफवा पसरवित आहेत. याबाबत प्रत्यक्षात पोलिसात मात्र, तक्रार अद्यापपर्यंत आलेली नसल्याचे चाकण पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

अफवांचा प्रकार सोशल मीडियासह ग्रामीण भागात महिलांमधून मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे. सध्या या भागातील प्रत्येक गावात चोरट्यांच्या टोळीची चर्चा आहे. चोरीच्या अफवांनी पोलिसांना जेरीस आणले आहे. नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी अनेकदा पोलिसांना अफवा पसरलेल्या गावांमध्ये रात्री अपरात्री जावे लागते. प्रत्यक्षात तिथे कोणीही नसते. त्यामुळे चोरट्यांच्या टोळीची अशी रोज अफवा उठली, तर कधीतरी ‘लांडगा आला रे आला’… या कथेसारखी परिस्थिती उद्भवण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

चोरट्यांची टोळी ही अफवा –  पोलीस निरीक्षक गिरीगोसावी

चाकण परिसरात ज्या भागात चोरट्यांच्या अफवा पसरल्या आहेत तो भाग पोलिसांनी पिंजून काढला आहे. परंतु कोठेही चोरांचे वास्तव्य असल्याचा कसलाही पुरावा मिळालेला नाही. त्यामुळे तालुक्यात चोरटे आहेत या केवळ अफवा असून नागरिकांनी यावर विश्वास ठेवू नये. काही अनुचित प्रकार घडल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. तसेच नागरिकांनी सोशल मीडियावरील मजकुराची खात्री करावी. चोरट्यांविषयीचा खोटा मजकूर पसरवू नये, असे आवाहन चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी केले आहे.

"advt"

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.