चाकणमध्ये औद्योगिक सुरक्षा सप्ताहास उत्साहात सुरुवात; कारखान्यांत विविध उपक्रम

एमपीसी न्यूज – वाहन उद्योगाची पंढरी म्हणून नावारूपास आलेल्या चाकण (ता.खेड) औद्योगिक वसाहतीत प्रतिवर्षी प्रमाणे 4 मार्च ते 11 मार्च दरम्यान औद्योगिक सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. उद्योजक आणि कामगारांना औद्योगिक सुरक्षा, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने जागरूक ठेवण्याचे काम या सप्ताहात करण्यात येणार आहे.

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना 4 मार्चला झाली. त्यामुळे 4 ते 11 मार्च हा कालावधी ‘औद्योगिक सुरक्षा सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो. कामगारांना त्यांच्या सुरक्षेचे महत्त्व कळावे, या उद्देशाने प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यासाठी कारखान्यांमधील सुरक्षा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

सुरक्षा सप्ताहात शनिवारी (दि.4) पहिल्या दिवशी विविध कारखान्यांमध्ये कामगारांना सुरक्षेची शपथ देण्यात आली. त्यानंतर आठवडाभर प्रशिक्षण, घोषवाक्य, पोस्टर स्पर्धा, चर्चासत्रे घेण्यात येणार आहेत. चाकण एमआयडीसीमध्ये औद्योगिक सुरक्षा विषयक उपक्रमांना राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय, कंपन्या आणि कामगार यांच्याकडून प्रतिसाद वाढत आहे. सर्व कारखान्यांच्या प्रवेशद्वारावर औद्योगिक सुरक्षा सप्ताहाचे फलक झळकताना दिसून येत आहेत.

याबाबत पुणे विभागाचे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे अप्पर संचालक एस.एल.चौधरी यांनी सांगितले की, सर्व कारखान्यांनी या सप्ताहात सुरक्षेसंबंधी विविध उपक्रम राबविले पाहिजेत. कारण औद्योगिक क्षेत्रात मोठी स्पर्धा सुरू झाली असून, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. नवीन तंत्रज्ञान हाताळताना कामगारांनी सतर्क राहिले पाहिजे. प्रत्येक कारखाना, उद्योगाची कामाची एक सुरक्षा पद्धत ठरलेली असते. त्या पद्धतीने कामगारांनी काम करणे आवश्यक असते. उद्योजक, कामगार यांनी याबाबत ‘शॉर्टकट’ टाळला पाहिजे, त्यामुळे औद्योगिक अपघातांना आळा बसेल.

"advt"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.