कंटेनर पलटल्याने द्रुतगती मार्गावर सुमारे दोन तास वाहतूक विस्कळित

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाखाली एक कंटेनर पलटल्याने या मार्गाने मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक सुमारे दोन तास विस्कळित झाली होती.

सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणारा एक कंटेनर (क्र.एम.एच.04 एच.डी. 9871) चालकाचा ताबा सुटल्याने अमृतांजन पुलाच्या कठड्याला धडकून मध्य रस्त्यात पलटी झाला. या अपघातात कंटेनर चालकाला किरकोळ मार लागला. मात्र, कंटेनर अमृतांजन पूलच्या बरोबर खाली रस्त्याच्या मधोमध पलटल्याने या मार्गाने मुंबईकडे जाणाऱ्या दोन लेन वाहतुकीस पूर्ण बंद झाल्या. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळित झाली.

खंडाळा आणि बोरघाट महामार्ग पोलिसांनी तातडीने धाव घेत एका लेनने मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरू ठेवली, तर दुसरीकडे वलवण गावातील सेंटर पॉईंट येथून द्रुतगती मार्गावरील वाहतूक जुन्या मुंबई पुणे महामार्गाने मुंबईच्या दिशेने वळविण्यात आली. यामुळे लोणावळा शहरातही लोणावळेकर नागरिकांना आणि प्रवाशांना काही काळ या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

दरम्यान, महामार्ग पोलिसांनी साडेदहा वाजण्याच्या सुमारास दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर सदर अपघातग्रस्त कंटेनर एक पुलर आणि एका क्रेनच्या मदतीने महामार्गावरून बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.