एकनाथ खडसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास पुणे पोलिसांचा नकार!

एमपीसी न्यूज – भोसरी येथील एमआयडीसीच्या भूखंड खरेदी आरोपाप्रकरणी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर कोणत्याही स्वरुपाचा दखलपात्र गुन्हा दाखल होत नसल्याचे पत्र बंडगार्डन पोलिसांनी तक्रारदार हेमंत गवंडे यांना दिले आहे. 

भोसरी येथील एमआयडीसीचा भूखंड माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी बेकादेशीररित्या बळकावल्याचा आरोप हेमंत गवंडे यांनी केला होता. याप्रकरणी एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, गिरीश चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार गवंडे यांनी 30 मे 2016 रोजी पुण्यातील, बंडगार्डन पोलिसांकडे दिली होते. 

पोलिसांनी आठ महिन्यांनी गवंडे यांच्या तक्रारीला उत्तर दिले आहे. मंगळवारी (दि.7) रात्री बंडगार्डन पोलिसांनी एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, गिरीश चौधरी यांच्याविरुद्ध दिलेल्या तक्रारी अर्जाच्या चौकशीमध्ये कोणत्याही स्वरुपाचा दखलपात्र गुन्हा होत नसल्याचे पत्र गवंडे यांना दिले आहे. 
हेमंत गवंडे म्हणाले, भूखंड खरेदीप्रकरणी पोलिसांना सबळ पुरावे दिले असतानाही पोलीस ‘क्लिन चीट’ देतात ही शोकांतिका आहे. पोलिसांनी ‘क्लिन चीट’ दिली आहे. पंरतु, पुरावे नष्ट होत नाहीत. तक्रार दिल्यानंतर आठ महिन्यांनी पोलिसांनी त्याचे उत्तर दिले आहे. याप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरु आहे. लवकरच त्याचा निर्णय येईल.  

दरम्यान,  भोसरी येथील एमआयडीसीच्या भूखंड खरेदी आरोपाप्रकरणी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात सरकारला काय अडचण आहे, असा सवाल करत उच्च न्यायालयाने  निर्णय घेण्यासाठी सरकारला शेवटची संधी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.