डीसीपी असल्याची बतावणी करून लुटणा-याला त्याच्या साथीदारांसह अटक

एमपीसी न्यूज – पोलीस उपायुक्त बी.व्ही. शिर्के असल्याची बतावणी करून नागरिकांना लुटणा-याला त्याच्या साथीदारांसह प्रॉपर्टी सेलच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडल्यानंतर त्याचे इतर 6 साथीदार नवले ब्रीज येथून पळून जाण्याच्या तयारीत असताना प्रॉपर्टी सेलच्या गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. कारवाईत त्यांच्याकडून आठ लाख रुपये किमतीच्या दोन स्विफ्ट डिझायर गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

भास्कर विजय शिर्के, असे मुख्य आरोपीचे नाव आहे. (पोलीस उपायुक्त असल्याची तो बतावणी करत होता.) सोहेब महंमद शेख (वय 22, रा. दत्तमंदिराजवळ पर्वती), आकाश नवनाथ जठार (वय 23, रा. बिबवेवाडी), शंकर गुलाब मुजूमले (वय 29, रा. न-हे गाव, मूळ ता. हवेली), गणेश दत्तात्रय मुजूमले (वय 27, रा. ता. हवेली) विकास विलास गव्हाणे (वय 23, ता. हवेली) रवींद्र सोनबा खाटपे (वय 22 रा. ता. हवेली), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

प्रॉपर्टी सेल शाखेच्या अधिका-यांना, पोलीस उपायुक्त असल्याची बतावणी करून नागरिकांना लुटणा-या टोळीचा म्होरक्या भास्कर शिर्के याचे सर्व साथीदार नवले ब्रीज येथून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, नवले ब्रीज येथे सापळा रचून प्रॉपर्टी सेलच्या अधिका-यांनी या 6 आरोपींना अटक केली.

या सर्व आरोपींनी विशेष अधिकारी असल्याचे भासवण्यासाठी एकसारखा पोशाख परिधान केला होता. ते सर्व व्हि. डी आय गाडी क्रमांक एमएच 12 केई4187 किंमत रुपये तीन लाख, तर स्विफ्ट डिझायर क्रमांक एमएच 12/ एनजे 8296 किंमत 5 लाख या गाड्यांमधून पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र, त्यांना त्याचवेळी सापळा रचून अटक करण्यात आली. आमचा मुख्य साथीदार भास्कर विजय शिर्केला पोलिसांनी अटक केल्याने आम्ही पळून जात असल्याची त्यांनी कबुली दिली.

या सर्व आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.