‘डिपेक्स’ विद्यार्थ्यांसाठी मोठे व्यासपीठ – डॉ. व्ही.व्ही. परळीकर

पिंपरीत ‘डिपेक्स’ 2017 चे दिमाखात उद्‌घाटन 


एमपीसी न्यूज – ”विद्यार्थी केंद्रीत उपक्रम राबविणे सोपे नाही. गेल्या 27 वर्षांपासून डिपेक्स विद्यार्थी केंद्रीत उपक्रम राबवित आहे. ‘डिपेक्स’मधील सर्व प्रकल्प उपयोगी आहेत. ‘डिपेक्स’ हे विद्यार्थ्यांसाठी एक सुदंर व्यासपीठ आहे असे, मत संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) संशोधन व विकास अस्थापनेचे संचालक डॉ. व्ही.व्ही. परळीकर यांनी आज (शुक्रवारी) पिंपरीत व्यक्त केले.


पिंपरीतील, एच. ए. मैदानावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सृजन संस्थेतर्फे, डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या विशेष सहकार्याने आयोजित केलेल्या 28 व्या राज्यस्तरीय ‘डिपेक्स’ प्रदर्शनाचे परळीकर यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वासुदेव गाडे, अभाविपचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रशांत साठे, डिपेक्स 2017 च्या स्वागत समितीचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड, उपाध्यक्ष डॉ. सोमनाथ पाटील, सचिव दीपक पांचाळ, अभाविपच्या उपाध्यक्षा प्रा. सरिता बलशेटवार, सृजन ट्रस्टचे डॉ. राजेंद्र हिरेमठ, उमहापौर शैलजा मोरे, नगरसेविका सुलक्षणा धर-शिलवंत उपस्थित होते.


डिपेक्समध्ये शेतीपुरक, पुराच्या प्रसंगी कामास येणार प्रकल्प आहेत, असे सांगत डॉ. परळीकर पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने सुरु केलेल्या ‘स्टार्ट अप इंडिया’, ‘मेक इन इंडिया’ या योजना विद्यार्थ्यांसाठी समर्पक आहेत. विद्यार्थ्यांची तयारी, उत्साह आणि त्यांचे प्रकल्प पाहून भारावून गेलो आहे. ‘डिपेक्स’मुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत आहे.


डिपेक्स एक चळवळ आहे. महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहे. डिपेक्स सारख्या संस्था नव उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करून देतात. त्यामुळे महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात एक नंबर आहे, असे सांगत डॉ. वासुदेव गाडे म्हणाले की, महाविद्यालयांमध्ये संशोधनाला फार मोठे महत्व देण्यात आले आहे. ‘A’ ग्रेड असणारी महाविद्यालये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आहेत.


देशाचा विकास घडवून आणायचा असेल तर सुशिक्षित समाज असला पाहिजे. शिक्षणाचा पाया पक्का असला पाहिजे, असे असेल तर समजाची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. विद्यार्थ्यांकडे कलागुण आहेत. त्यांना पाठबळ मिळाले पाहिजे. विद्यार्थ्यांनी ‘डिपेक्स’मध्ये उत्कृष्ठ प्रकल्प सादर केले आहेत. कोणतीही गोष्ट पूर्णत्वाला नेईपर्यंत सोडता कामा नये. तो प्रकल्प समाजापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी परिश्रम घ्यावे, असेही गाडे म्हणाले.


नवीन उद्योजक होण्यासाठी ही चांगली वेळ आहे. यापेक्षा चांगली वेळ पुन्हा कधी येणार नाही. सरकारने ‘स्टार्ट अप इंडिया’, ‘मेक इन इंडिया’ अशा विविध योजना सुरू केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी धोका स्वीकारून व्यवसायात उतरावे. नवीन काहीतरी करण्याची इच्छाशक्ती विद्यार्थ्यांमध्ये असली पाहिजे. अपयश आली तरी घाबरून जायचे नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. नव उद्योजक निर्माण करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रयत्न करत आहे, असेही ते म्हणाले.


विद्यार्थ्यांनी स्वत:च्या प्रकल्पावर विश्वास ठेवला पाहिजे. विश्वास ठेऊन काम केल्यास यश मिळणारच, असेही म्हणाले. आपल्या नियोजनामध्ये दोष असल्यामुळे इतरांवर अवलंबून रहावे लागत आहे. औद्योगिक कंपन्या, शैक्षणिक संस्था आणि सरकारने एकत्र येऊन काम केल्यास शेती, ऑटोमोबाईल अशा कोणत्याच क्षेत्रात आपण मागे राहणार नाही, असेही डॉ. गाडे म्हणाले.


स्वागत समितीचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड म्हणाले की, ‘आयुष्य एक संघर्ष असते. विद्यार्थ्यांनी संघर्ष केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी नेहमीच नावीन्य शोधवे. आयुष्यामध्ये वेगळे काहीतरी करण्याचा प्रयत्न करावा. धडपड करावी, धडपड केल्यानंतर यश हमखास मिळते.


पैसे तर सगळेच कमवतात. मानवतेला धरून काम करावे. तळागाळातील नागरिकांसाठी काम करावे, असे सांगत गायकवाड म्हणाले, विद्यार्थ्यांनी स्वत:साठी शिकावे. पदवी घेऊन काही उपयोग नाही. एखादी गोष्ट हाती घेऊन त्यामध्ये झोकून देऊन काम केल्यास आयुष्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. कोणाला खूश करण्यासाठी शिक्षण घेऊ नये, असेही गायकवाड म्हणाले.


महाविद्यालयीन आयुष्यात मोहाचे क्षण येतात. त्या मोहाला विद्यार्थ्यांनी बळी पडू नये. आयुष्यामध्ये एखादे स्वप्न ठेऊन त्या मार्गाने काम करावे, असे गायकवाड म्हणाले.  


यावेळी प्रोजेक्ट डिरेक्टरीच्या सीडीचे प्रकाशन करण्यात आले. प्रशांत साठे, डॉ. राजेंद्रम हिरेमठ यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  प्रा. सरिता बलशेटवार यांनी केले. प्रदेश मंत्री राम सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. दीपक पांचाळ यांनी आभार मानले. 

"dipex
"dipex
"dipex
"dipex

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.