युवा सहयोग कीर्तन महोत्सव मंगळवारपासून


कै.गोविंदस्वामी आफळे यांच्या जन्मशताब्दी निमित्त नारद व्यास मंदिर येथे कार्यक्रम

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय कीर्तनकार कै. गोविंदस्वामी आफळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आफळे अकादमीच्या वतीने युवा सहयोग कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. दिनांक 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान दररोज सायंकाळी 6.00 वाजता सदाशिव पेठेतील नारद व्यास मंदिर येथे हा कार्यक्रम होणार असून याकरिता विनामूल्य प्रवेश आहे, अशी माहिती शुभांगी आफळे यांनी दिली. 

सप्ताहाचे उद्घाटन मंगळवारी (दि.1ऑगस्ट) सायंकाळी 6.00 वाजता होणार असून लोकमान्य टिळक याविषयावर मृदुला सबनीस, मोहना नातू यांचे कीर्तन होणार आहे. सप्ताहात महापुरुषांची चरित्रे, इतिहास, सामाजिक आणि सद्य परिस्थिती अशांशी निगडीत नानाविध विषय कीर्तनातून मांडण्यात येणार आहे. युवा कीर्तनकार मृदुला सबनीस, मोहना नातू यांसह रेशीम खेडकर, नम्रता निमकर, प्रज्ञा हस्तक, मानसी बडवे, प्रतिक देशमुख, प्रभंजन भगत, चिन्मय देशपांडे, प्रणव देव, दर्शन वझे, निहाल खांबेटे आदी कीर्तन करणार आहेत. तसेच सोमवारी (दि.7 ऑगस्ट) सायंकाळी 6.00 वाजता राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी काल्याचे कीर्तन होणार आहे. 

राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे म्हणाले की, कीर्तनांमधून युवकांसह युवती देखील विविध विषयांवर प्रबोधन करणार आहेत. सहयोग कीर्तने म्हणजे पूर्वरंग व उत्तररंग वेगवेगळ्या कीर्तनकारांनी सादर करणे. त्यामुळे हा वेगळा कीर्तनप्रकार अनुभविण्यासाठी ज्येष्ठांसह तरुण आणि विद्यार्थी वर्गाने देखील मोठया संख्येने सहभागी व्हावे. कीर्तन सप्ताहाकरिता मोफत प्रवेश असून माहितीकरिता 9850992233 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.