नदीपात्रातील धोकादायक दगडावरील स्टंट बेतला तरुणाच्या जीवावर


उडी मारताना कुंड मळा येथे इंद्रायणीत बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

एमपीसी न्यूज – नदीपात्रातील धोकादायक दगडावर उडी मारण्याचा स्टंट तरुणाच्या जीवावर बेतला. इंद्रायणी नदीत कुंड मळा येथे शनिवारी (दि. 29) बुडून बेपत्ता झालेल्या 25 वर्षीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचा मृतदेह आज सापडला आहे.

अतुल दशरथ पाटील (वय 25, रा.  ढोलीगाव ता. पारोळा जि. जळगाव ), असे या तरुणाचे नाव आहे.

पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आकुर्डी येथील अभियांत्रिकी शाखेचे 9 विद्यार्थी वर्षाविहारासाठी इंद्रायणी नदीपात्राच्या कुंडमळा (इंदोरी ता.मावळ) येथे आले होते. नदीपात्रावरील धोकादायक दगडावर उभे राहून फोटो काढून परतताना दगडावरून उडी मारताना पाण्यात पडल्याने अतुल वाहून गेला होता. त्याची ही शेवटची धोकादायक उडी (स्टंट) कैमेऱ्यात कैद झाली आहे. 

पोलीस निरीक्षक पांडुरंग सुतार, उपनिरीक्षक विक्रम पासलकर, अरविंद हिंगोले, कर्मचारी महेश गायकवाड, विठ्ठल काळे, स्थानिक ग्रामस्थ व सुदुंबरे (ता.मावळ) येथील एन डी आर एफ पथकाचे जवानांनी बोट व पाणबुडीच्या सहाय्याने नदीपात्रात त्याचा शोध घेण्यासाठी सायंकाळी 7.00 वाजता घटनास्थळी पोहचले होते. अंधार पडल्याने शोध कार्य थांबवून रविवार (दि.30) रोजी सकाळी 7.00 वाजता पुन्हा येऊन इंद्रायणी नदीपात्रातील पाण्याच्या वेगाचा अंदाज घेऊन बोट व पाणबुडीच्या सहाय्याने त्याचा शोध घेतला सुमारे साडेचार किलोमीटर अंतरावर त्याचा मृतदेह सकाळी 11.30 वाजता सापडला. डॉ. प्रवीण कानडे यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.