महावितरणच्या ‘नवप्रकाश’ योजनेला जुलै 2017 अखेरपर्यंत मुदतवाढ

वीजग्राहकांना थकबाकीमुक्तीसह वीजजोडणीची संधी


एमपीसी न्यूज – थकीत वीजदेयकांमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या सार्वजनिक नळयोजना ग्राहक वगळून इतर सर्व उच्च व लघुदाब वीजग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी सुरु असलेल्या ‘नवप्रकाश’ योजनेला येत्या 31 जुलै 2017 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.



मुदतवाढ मिळालेल्या ‘नवप्रकाश’ योजनेनुसार आता येत्या 30 एप्रिल 2017 पर्यंत मूळ थकबाकीचा भरणा केल्यास 100 टक्के व्याज व विलंब आकाराची रक्कम माफ होणार आहे. याआधी ही मुदत 31 जानेवारी 2016 पर्यंत होती. तसेच 1 मे 2017 ते 31 जुलै 2017 या कालावधीत मूळ थकबाकीसह व्याजाची 25 टक्के रक्कम भरल्यास उर्वरित 75 टक्के व्याज व 100 टक्के विलंब आकाराची रक्कम माफ होणार आहे.



या योजनेत दि. 31 मार्च 2016 पर्यंत कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या कृषीपंपधारक, घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक तसेच इतर वर्गवारीतील (सार्वजनिक नळयोजना ग्राहक वगळता) वीजग्राहकांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय लोकअदालत किंवा न्यायप्रविष्ट असलेल्या थकबाकीच्या प्रकरणातील थकबाकीदारांना सहभागी होता येणार आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणात हुकुमनामा (डिक्री) मंजूर होऊन 12 वर्षांपेक्षा अधिक  झाली असल्यास अशा ग्राहकांनाही या योजनेत सहभागी होता येईल.



मूळ थकबाकीच्या रक्कमेचा भरणा करण्यासाठी महावितरणच्या संकेतस्थळावर ‘ऑनलाईन’ सोय असून संबंधीत ग्राहकांच्या थकीत देयकांची व किती रक्कम भरायची याबाबत माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. या योजनेत सहभाग घेऊन थकबाकीमुक्त झालेल्या वीजग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार त्वरीत नवीन वीजजोडणी देण्यात येत आहे. त्यासाठी सुरक्षा ठेव, सर्व्हीस कनेक्शन चार्जेस, रिकनेक्शन चार्जेसमधून सूट देण्यात येत आहे. महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर संबंधीत ग्राहकांच्या थकीत देयकांची व किती रक्कम भरायची याची माहिती उपलब्ध आहे. ही रक्कम ‘ऑनलाईन’सह धनादेशद्वारेही भरता येणार आहे. याशिवाय महावितरणच्या शाखा ते मंडल कार्यालयांत नवप्रकाश योजनेत सहभागी होणाऱ्या ग्राहकांना थकबाकीच्या रकमेचा तपशील तातडीने उपलब्ध करून देण्यात येत आहे. कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या थकबाकीदार वीजग्राहकांनी नवप्रकाश योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.