Pimpri : आदिवासी भागातील मुलींना 50 सायकलींचे वाटप

रोटरी क्लब ऑफ निगडीचा उपक्रम 

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ निगडीच्या पुढाकारातून व आदिम संस्कृती, संशोधन संस्था, ता.आंबेगाव यांच्या स्थानिक संयोजनातून पोखरी येथील पंढरीनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या शाळेतील  मुलींसाठी ३४ सायकली भेट देण्यात आल्या.

आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील पोखरी येथील पंढरीनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ही एक गुणवत्तापूर्ण शाळा आहे. या शाळेत परिसरातील गावातून अनेक विदयार्थी  सुमारे ४ ते ६ कि.मी.अंतर आजही पायी चालत शाळेत येतात. या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब ऑफ निगडीच्या पुढाकारातून व आदिम संस्कृती, संशोधन संस्था, ता.आंबेगाव यांच्या स्थानिक संयोजनातून या शाळेत शिकणाऱ्या मुलींसाठी ३४ सायकली तर जांभोरी येथून शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या मुलींसाठी १६ सायकली अशा एकूण ५० सायकल आदिवासी भागातील मुलींसाठी प्राप्त झाल्या आहेत.

या सायकलीसाठी रोटरी क्लब निगडी पुणे यांनी आर्थिक भार उचलला व पोखरी येथील ३६ सायकली प्राप्त होणा-या मुलींच्या पालकांनी प्रत्येकी १००० रुपये देऊन आपला सहभाग नोंदविला तर जांभोरी येथील १६ सायकलीसाठी प्रत्येकी १००० प्रमाणे ग्रामविकास प्रतिष्ठान, नांदूरकीचीवाडी यांनी रक्कम देऊन आपला सहभाग नोंदविला.या सायकलींच्या औपचारिक वाटपाचा कार्यक्रम दि.१ मे रोजी पोखरी येथील पंढरीनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय  येथे पार पडला. यावेळी रोटरी क्लब निगडी यांचे अध्यक्ष सुभाष जयसिंघानी,  सर्व रोटरीयन, संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब कोळप, पोखरी गावचे उपसरपंच सचिन भागीत, आदिम संस्थेचे डॉ. अमोल  वाघमारे, किसान सभेचे अशोक पेकारी, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे  आदी उपस्थित होते.

यावेळी सुभाष जयसिंघानी म्हणाले, “मुलींना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा व त्यांना शाळेत वेळेवर  पोहचता यावे यासाठी या सायकल मुलीना देण्यात आल्या आहेत”या कार्यक्रमात मुख्यत पोखरी येथील शाळेत शिकणाऱ्या मुलीना या सायकली वाटप करण्यात आल्या व जांभोरी येथे लवकरच एका छोटेखानी कार्यक्रमात येथील मुलीना  सायकल प्रदान केल्या जाणार आहेत. या कार्यक्रमाच्या संयोजनात या शाळेतील मुख्याध्यापक जाधव व सर्व शिक्षक यांनी अत्यंत महत्वपूर्ण भूमिका पार पाडली.बाळासाहेब कोळप यांनी प्रास्ताविक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.