BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari: सागरमाथाची माउंट मेन्टोक ‘कांगरी’वर यशस्वी चढाई

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – भोसरी येथील सागरमाथा गिर्यारोहण संस्थेने लेह-लडाख परिसरातील माउंट मेन्टोक कांगरी हे 6250 मीटर उंचीचे शिखर नुकतेच यशस्वीपणे सर केले.

एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर यांच्या नेतृत्वाखाली प्रशांत पवार, संदीप तापकीर, सुमित दाभाडे, संग्राम बुर्डे, श्रीकांत जाधव, पांडुरंग शिंदे, श्रीधर घाडगे, निकेश रासकर व संकेत घुले या दहा सदस्यांनी ही मोहीम यशस्वी केली. संस्थेच्या दशकपूर्ती वर्षानिमित्त ही मोहीम आयोजित करण्यात आली होती, अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष प्रवीण हरपळे यांनी दिली.

पुणे येथून 12 ऑगस्ट रोजी मोहिमेस सुरवात झाली. पुणे-दिल्ली-मनाली मार्गे सर्व सदस्य 15 ऑगस्ट रोजी लेह येथे पोहोचले. दरम्यान स्वातंत्र्य दिनी मनाली-लेह या मार्गातील अतिउंचवरील रोहतांग पास (13060 फुट), बारलाचा पास (16500 फुट), नकिला पास (15547), लाचुंगला पास (16616 फुट) आणि तांगलांगला पास (17480 फुट) या ठिकाणी तिरंगा ध्वज फडकवून करून 72 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.

17 ऑगस्ट रोजी मुख्य गिर्यारोहणास सुरवात झाली. सर्व सदस्य त्सोमोरीरी लेकच्या शेजारी असलेल्या कोर्झुक गावी पोहोचले. तेथून थोडे पुढे जाऊन 4500 मीटर उंचीवर पहिला कॅम्प लावण्यात आला. दुस-या दिवशी 4650 मीटर उंचीवर कोर्झूक-फू येथे दुसरा कॅम्प लावण्यात आला. तिस-या दिवशी 5400 मीटर उंचीपर्यंत चढाई करत बेस-कॅम्प लावण्यात आला.

चौथ्या दिवशी म्हणजेच 20 ऑगस्ट रोजी रात्री एक वाजता शिखरमाथ्याकडे चढाईस सुरवात झाली. ऑक्सिजनचे कमी प्रमाण, निसटते खडक व गोठविणारी थंडी यांचा सामना करत संदीप तापकीर, संग्राम बुर्डे व निकेश रासकर यांनी सकाळी साडेदहा वाजता शिखराच्या माथ्यावर (उंची 6250 मीटर) यशस्वीपणे पाऊल ठेवले. त्यांच्या पाठोपाठ असणा-या श्रीहरी तापकीर, श्रीकांत जाधव, पांडुरंग शिंदे व श्रीधर घाडगे यांना खराब हवामानामुळे शिखरमाथा केवळ 80 मीटर बाकी असताना पाठीमागे परतावे लागले.

या मोहिमेसाठी फिनोलेक्स उद्योग समूहाच्या संचालिका व सामाजिक कार्यकर्त्या रितुजी छाब्रिया, मुकूल माधव फाऊंडेशन, क्रांती शुगर सांगलीचे शरद लाड व शिवनेरी फाऊंडेशनचे शेखर मोहिते-पाटील यांचे आर्थिक सहकार्य लाभले.

HB_POST_END_FTR-A2

.