Chakan : प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणाचा खून

एमपीसी न्यूज – आपल्या प्रेयसीबरोबर दुसरा तरुण वारंवार बोलत आहे. हा प्रकार प्रियकराला सहन झाला नाही. आपल्या नात्यामध्ये तिसरा आडकाठी बनत असल्याचा समज करून घेत प्रियकराने मित्रांच्या मदतीने आडकाठी ठरणा-या तरुणाचा खून केला. हा प्रकार शुक्रवारी (दि. 14) दुपारी अडीचच्या सुमारास चाकण आळंदी रोडवर गायरानात घडला.

व्यंकट नागोराव जाधव (वय 28, रा. सोनवणे निवास, विमाननगर पुणे) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अक्षय सोनवणे (रा. चिंबळीगाव, पुणे), अविनाश उर्फ रविराज रोहिदास देडे (वय 22, रा. आदर्शनगर, मोशी), आदित्य मु-हे (रा. मु-हेवस्ती, कुरुळी, पुणे), महादेव भाग्यवंत (रा. मोशी, पुणे), आकाश गायकवाड (रा. धावडे वस्ती, भोसरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नामदेव नागोराव जाधव (वय 32, रा. सोनवणे निवास, विमाननगर पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय याचे एका तरुणीसोबत प्रेमप्रकरण सुरु आहे. नामदेव त्या मुलीबरोबर बोलण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र अक्षय याला नामदेवचे त्याच्या प्रेयसीबरोबर बोलणे पसंत नव्हते. त्यामुळे अक्षय याने त्याच्या अन्य चार मित्रांच्या मदतीने नामदेवला शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमरास चाकण आळंदी रोडवरील रुडाई माता मंदिरापासून पुढे रासे येथील गायरानात नेले. तिथे सर्वानी मिळून ‘नामदेव याने अक्षय याच्या प्रेयसीसोबत कसलेही संबंध ठेवायचे नाहीत’, असे म्हणून नामदेव याला चामडी पट्ट्याने बेदम मारहाण केली.

यामध्ये नामदेव गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला. नामदेवचा मृत्यू झाला तर आपल्यावर नाव येईल, या भीतीने सर्व आरोपींनी नामदेव याला मोशी येथील संत ज्ञानेश्वर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात दाखल करत असताना आरोपींनी नामदेव याचा अपघात झाला असल्याचे सांगितले. नामदेव याच्यावर उपचार सुरु होताच सर्वानी रुग्णालयातून पळ काढला. मात्र, उपचारापूर्वीच नामदेवचा मृत्यू झाला. यावरून चाकण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.