Pune : उद्या जाहीर होणार 11 गावांतील अंतिम प्रभाग रचना

एमपीसी न्यूज- पुणे महापालिका हद्दीमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या 11 गावांच्या निवडणुकींसाठी जाहीर केलेल्या प्रभाग रचनेवर घेण्यात आलेल्या 24 हरकती आणि सूचनांवर सुनवाई पूर्ण झाली आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनवाई घेण्यात आली.

यामध्ये प्रामुख्याने नगरसेवकांची संख्या वाढवावी, प्रभागांची संख्या 3 करावी, दैनंदिन कामकाजासाठी प्रभाग हद्दीनुसार क्षेत्रीय कार्यालायास जोडावा अशा प्रकारच्या हरकती उपस्थित केल्या. सुमारे सव्वातास ही सुनावणी चालली. दरम्यान, या हरकती आणि सूचनांवर उद्या ( 20 ऑक्टोबर ) रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक विभागाचे प्रमुख संतोष भोर यांनी दिली.

सबंधित 11 गावांमध्ये निवडणूक प्रक्रिया अखेर सुरु झाली असून या गणासाठी एकच प्रभाग वाढणार आहे. त्यात केवळ 2 नगरसेवक असणार आहेत. यामध्ये दोन्ही जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत. त्यात 1 जागा पुरुषासाठी तर 1 जागा महिलेसाठी राखीव असणार आहे. दरम्यान, 11 गावांमध्ये लोहगाव आणि फुरसुंगी या गावांची लोकसंख्या अधिक असल्याने याला फुरसुंगी- लोहगाव असे या प्रभागाला नाव देण्यात आले आहे. या प्रभागाची लोकसंख्या दोन लाख 39 हजार इतकी असून क्षेत्रफळ आणि लोकसंख्या विचारात घेता हा पुणे महापालिकेतील सर्वात मोठा प्रभाग ठरणार आहे. तरीदेखील या गावांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी फक्त दोनच नगरसेवक असल्याने नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.