Talegaon : बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

देशी बनावटीच्या पिस्तूलासह चार जिवंत काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज – बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेने एकाला अटक केली. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई गुरुवारी (दि. 18) आढे गावातील जिल्हा परिषद शाळेसमोर केली.

सुधीर विठ्ठल सुतार (वय 28, रा. आढे, पोस्ट उर्से, ता. मावळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आढे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर एक तरुण संशयितरित्या थांबला आहे. त्याच्याकडे पिस्तूल आहे. अशी माहिती गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सुधीर याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल मिळून आले. त्यामध्ये चार जिवंत काडतुसे मिळाली. मिळालेल्या पिस्तुलाबाबत सुधीरकडे चौकशी केली असता त्याने त्याच्याकडे कोणतेही अग्निशस्त्र बाळगण्याचा परवाना नसल्याचे सांगितले. त्यावरून हा ऐवज पोलिसांनी जप्त केला. तसेच सुधीर याच्यावर तळेगाव पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम 3 (25) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (3) अन्वये गुन्हा दाखल करून त्यात त्याला अटक केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपाली मरळे, पोलीस कर्मचारी भिवसेन सांडभोर, संपत निकम, किरण आरुतें, संजय गवारी, दत्तात्रय बनसुडे, विक्रांत गायकवाड, मयूर वाडकर यांच्या पथकाने केली. साहाय्यक पोलीस निरीक्षक दीपाली मरळे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.