Nigdi: प्राधिकरणाच्या हद्दीतील रेडझोन बाधित मिळकतींचे हस्तांतरण करा

नगरसेवक केंदळे यांची पीसीएनटीडीएचे अध्यक्ष खाडे यांच्याकडे मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण क्षेत्रातील सेक्टर नंबर 20,21,22,23 व 24 हा भाग सन 2012 पासून रेडझोन म्हणून घोषित झाला आहे. या जागांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांची नोंद कोणत्याही शासकीय कार्यालयांमध्ये होत नाही. अशा व्यवहारामुळे सरकारचा महसूल बुडत आहे. त्यासाठी प्राधिकरणाचे रेडझोन हद्दीतील मिळकतीचे हस्तांतरण करण्यात यावे. त्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी नगरसेवक उत्तम केंदळे यांनी प्राधिकरणाकडे केली आहे.

याबाबत प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांना निवेदन दिले आहे. त्यात नगरसेवक केंदळे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण क्षेत्रातील सेक्टर नंबर 20,21,22,23 व 24 हा भाग सन 2012 पासून रेडझोन म्हणून घोषित झाला. तरीही, या भागामध्ये सद्यस्थितीत मोठया प्रमाणात दाट लोकवस्ती आहे. त्यामुळे या भागामध्ये सन 2012 पूर्वी मोठ्या प्रमाणात निवासी / बिगरनिवासी गाळयांची खरेदी विक्री व्यवहार झालेले असून सध्या देखील व्यवहार होत आहेत. परंतु, येथील क्षेत्र रेडझोन म्हणून घोषित असल्यामुळे या व्यवहारांची नोंद कोणत्याही शासकीय कार्यालयांमध्ये होत नाही.

या व्यवहारामुळे सरकारचा महसूल बुडत असून आर्थिक नुकसान होत आहे. तसेच हे क्षेत्र प्राधिकरणाचे अखत्यारित येत असतानाही प्राधिकरणाचीही हस्तांतर फी/विकास शुल्क बुडून आर्थिक नुकसान होत आहे. या सर्व प्रकारामुळे खरेदी विक्री करणा-या नागरिकांची मोठी फसगत होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. भविष्यात प्राधिकरणास या भागामध्ये काही प्रशासकीय कार्यवाही करावयाची असल्यास त्यासाठीही रेकॉर्ड उपलब्ध असणार नाही.

त्यासाठी या भागातील मिळकतींच्या नोंदी प्राधिकरणाच्या दप्तरी असणे आवश्यक आहे. त्यासाठी या भागाचे प्राधिकरणामार्फत सर्वेक्षण करण्यात यावे. सर्वेक्षणानंतर मिळकतधारकांकडून रेडझोनबाबत भविष्यात होणा-या निर्णयास अधिन राहुन व त्या निर्णयातील नियम व अटीचे पालन करणे बंधनकारक राहील अशा आशयाचे मिळकत हस्तांतरणासाठी बंधपत्र लिहुन घेवुन मिळकत हस्तांतरण करणेस परवानगी द्यावी. तसेच रहिवाश्यांना मुलभूत सोयी-सुविधा पुरवून या परिसराचा विकास करणे सोयीचे होईल, असे नगरसेवक केंदळे यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.