Pimpri: अवैध नळजोड धारकांवर धडक कारवाई; 64 नळजोड तोडले

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने अवैध नळजोड धारकांवर धडक कारवाई सुरु केली आहे. गेल्या आठ दिवसात पाणीपुरवठा विभागाने 64 अवैध नळजोड तोडले असून त्यांचा पाणीपुरवठा बंद केला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत होत आहे. शहरात अनधिकृत नळजोडचे प्रमाण जास्त आहे. चुकीच्या पद्धतीने नळजोड केले आहेत. त्यामुळे 30 ते 40 टक्के पाण्याची गळती होत असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. तसेच दूषित पाणीपुरवठा देखील होतो. त्यासाठी महापालिकेने मे महिन्यापासून अनधिकृत नळजोडचे सर्वेक्षण केले. अनधिकृत नळजोड धारकांनी नियमित करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले होते. तथापि, नागरिकांचा त्याला अल्प प्रतिसाद मिळाला.

अनधिकृत नळजोडच्या सर्वेक्षणात शहरात केवळ 16 हजार अवैध नळजोड सापडले. यापैकी नियमित करण्यासाठी पाच हजार 14 जणांनी अर्ज केले होते. पाणीपुरवठा विभागाने दोन हजार 964 अर्ज मंजूर केले. तथापि, शहरातील अनधिकृत नळजोडची 16 हजार ही संख्या अतिशय नगण्य असून यापेक्षा शहरात अधिक अवैध नळजोड आहेत. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने गेल्या आठ दिवसांपासून अवैध नळजोड धारकांवर धडक कारवाई सुरु केली आहे. 64 नळजोड तोडले असून त्यांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. यापुढे देखील ही कारवाई तीव्र केली जाणार आहे.

ज्यांचे अनधिकृत नळजोड आहेत आणि ज्यांनी अर्ज भरले नाहीत, असे नळजोड तोडले जात आहेत. दोन नळजोड असलेल्या धारकांवर देखील कारवाई केली जात असून विभागनिहाय कारवाई केली जात आहे. पाण्याची चोरी करणा-यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे, पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.